प्रयागराजमध्ये हवाई दलाच्या अभियंत्याची गोळ्या घालून हत्या, अज्ञात हल्लेखोराकडून हल्ला
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भारतीय हवाई दलाच्या एका अभियंताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एसएन मिश्रा असे या मृत अभियंताचे नाव आहे. मिश्रा घरी झोपलेले असताना त्यांची हत्या करण्यात आली. रात्री उशिरा एका अज्ञात हल्लेखोराने बाहेरील खिडकीतून गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.
हवाई दलाचे मुख्य कार्य अभियंता एसएन मिश्रा यांची हत्या परस्पर वैमनस्यातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पूरमुफ्ती पोलिस स्टेशन परिसरातील बामहरौली परिसरातील एका कॉलनीत ही घटना घडली. हत्येची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
दरम्यान, प्रयागराज येथील कायदा आणि सुव्यवस्था आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अजय पाल शर्मा यांनी घटनेबाबत माहिती दिली आहे. आम्हाला हत्येची माहिती मिळताच मी आणि डीसीपी सिटी घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एकच व्यक्ती सहभागी होती आणि त्यानेच गोळीबार केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना हवाई दलाच्या आवारात घडली असल्याने तेथील सुरक्षा मानकांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून चौफेर तपास केला जात आहे. जे काही पुरावे समोर येतील त्यांच्या आधारे कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List