संघ ठरवणार मोदींचा वारसदार; तो बहुतेक महाराष्ट्रातला असणार! संजय राऊत यांचे सूचक विधान
सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 75 वर्ष पूर्ण करतील, आपल्या निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी त्यांना संघ कार्यालयाला भेट दिली असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मोदींचा राजकीय वारसदार संघ ठरवणार आणि बहुतेक तो महाराष्ट्रातला असेल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल नरेंद्र मोदींचही भाषण झालं. मोदी म्हणाले की संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. मोदींनी हा शोध कुठून लावला? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता याची त्यांनी माहिती घ्यावी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय सांगा. 150 वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, भगत सिंह, सरदार पटेल, वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसंग्राम झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. त्यात संघ कधीच नव्हता आणि कुठेच नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवायचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या लोकांची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त, , भ्रमिष्ट, वेडे करताय. हा देश एक दिवस वेड्यांचा, खोटारड्यांचा देश म्हणून एखाद्या यादीमध्ये यायचा.
गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेत हे सगळं सहन करत आहेत
कुणाल कामराच्या जिवीताला धोका आहे. देवेंद्र फडणवीसांना चांगलं काम करायचं असेल. तर त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या लोकांनी कामराला ठार मारायची धमकी दिली असा माणूस मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? दुसरा कोणी असता तर त्याला पोलीस घेऊन गेले असते. आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल दुसरा कोणी असता तर त्याला मोका लावला असता. त्यांच्या मंत्रिमंडळात असे लोक आहेत त्यांनी कुणाल कामराला टायरवर उलटा टाकून मारणं, जिवंत कसा राहतो अशी भाषा करणं ही विधान तुमच्या मंत्रिमंडळातले लोक करत आहे. आणि गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेत हे सगळं सहन करत आहेत.
पुढच्या 15 दिवसांत नरकातला स्वर्ग या मराठी पुस्तकाचं प्रकाशन
माझ्या पुस्तकात आर्थर रोड तुरुंगातले अनुभव तर आहेच. पण त्या काळात त्या देशातलं वातावरण होतं. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यातले भाजपचे काही टुकार नेते, यांनी ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना हाताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीने आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. तो प्रकार नेमका काय होता आणि त्या सगळ्याचं काय झालं? आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं, न्यायालयाने सुटका केली, या सर्वांवर अनुभव आहेत, तुरुंगात मी त्यावर काही टिपणं काढली, जो विचार केला त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं अनेक सहकाऱ्यांचं म्हणनं होतं. कारण संपादक, लेखक म्हणून मी सतत लिहित असतो. पण या विषयवार स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालं आहे, आणि साधारणतः पुढच्या 15 दिवसांत नरकातला स्वर्ग या मराठी पुस्तकाचं प्रकाशन होईल. हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत होईल. हे सगळे अनुभव देशाच्या जनतेपर्यंत जावेत. माझ्या प्रमाणे अनेक लोक तुरुंगात गेले, साकेत गोखले साबरमती तुरुंगात होते, संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आलं. कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या दबावाखाली झुकले नाहीत. पुस्तकांचा हेतू गौप्यस्फोट करणे नसतं. जेव्हा तुम्ही जीवनातले अनुभव कथन करता, त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणत नाहीत. जे घडलंय, जे अनुभवलंय, जे पाहिलंय, जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता ते सत्य कथन असतं, त्याला सत्याचे प्रयोग म्हणा फारतर.
दिल्ली आता दांडा घालतेय
आमच्या गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला. पण गुढी आमची कायम आहे, ती आमच्या हातातच आहे. ज्यांनी हा दांडा पळवला त्यांना दिल्ली आता दांडा घालतेय तो बघा आता.
निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी संघाच्या कार्यालयात
मोदी यांची सप्टेबंरमध्ये निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी ते संघाच्या कार्यालयात गेले होते. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 10-11 वर्षांत मोदी संघ मुख्यालयात गेले नाहीत. आता मोदी तिथे मोहन भागवतांना सांगायला गेले की टाटा बाय बाय मी जातोय. दोन गोष्टी आहेत संघाची ज्या मला समजल्या आहेत. एक मोहन भागवत आणि पूर्ण संघपरिवाराला देशाच्या नेतृत्वात बदल हवाय. मोदींची वेळ संपला आहे आणि देशात बदल हवाय. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आपल्या मर्जीने निवडू इच्छितो, त्यासाठी मोदी तिथे गेले होते. मोदीजी जाणार आहेत.
देशाचं नेतृत्व बदलावं लागेल
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की ज्यांचे वय 75 झाले आहे त्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या आणि संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर महिन्यात आपली वेळ आलेली आहे, त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी संघाची एक भूमिका आहे अशी बाब समोर आली आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी 10-11 वर्षात मोदींनी नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही. नड्डा यांनी तर 400 पार करण्यासाठी संघाची आम्हाला गरजच नाही असे विधान केले होते. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती मोदींचीच भूमिका असते.
झोला बहुत भरा हे उनका
राम, कृष्णही आले गेले. इश्वराचाही मृत्यू झाला. राम गेले, कृष्णही एका पारध्याच्या बाणाने इहलोक सोडून गेले. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागली. देव असो वा मनुष्य. ते विष्णूचे अवतार आहेत, ते नॉनबायोलॉजिकल आहेत हे जरी खरं असलं तरी हिंदुस्थान हा नॉनबायोलॉजिकल नाही. हिंदुस्थानची 140 कोटी जनता ठरवते. तुम्ही त्यांना कितीही मुर्ख बनवायचं ठरवलं, तरीही तुम्ही जे एक धोरण ठरवलं आहे सहकाऱ्यांसाठी 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुहेत जावं लागेल. फकीर आदमी है, झोला लेकर आया था अब झोला भरकर जाएगा. झोला बहुत भरा हे उनका.
मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून
नरेंद्र मोदी यांचे वारस कोण असतील हे राष्ट्रीय स्वयंसेवक ठरवतील. म्हणूनच मोदींना काल बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, ही चर्चा बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे. संघ पुढला नेता ठरवणार आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List