वाढदिवसाच्या एक दिवस आधी जीवन संपवलं; IIIT अलाहाबादच्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलवर मृत्यू
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने शनिवारी रात्री हॉस्टेल कॅम्पसमध्ये स्वत:चे जीवन संपवले. स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
प्रयागराजच्या झलवा भागात ही घटना घडली असून तेलंगणातील दिव्यांग विद्यार्थी राहुल मदला चैतन्य असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव आहे.त्याचा 21 वा वाढदिवस साजरा करण्याच्या एक दिवस आधी त्याने स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितले की घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही परंतु प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की राहुल परीक्षेत नापास झाल्यामुळे तो नाराज होता. संस्थेने सांगितले की या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री 11.55 वाजता राहुलने IIIT कॅम्पसमधील त्याच्या होस्टेलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. ‘माहिती मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात नेले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले’, अशी माहिती धूमनगंजचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) अजेंद्र यादव यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, परीक्षेत नापास झाल्यानंतर विद्यार्थी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अस्वस्थ होता, असे दिसून आले आहे, तसेच सविस्तर चौकशी सुरू आहे.
राहुलचा आईला शेवटचा मेसेज
विद्यार्थ्याचे कुटुंब रविवारी दुपारी तेलंगणाहून प्रयागराजला आले. राहुलची आई स्वर्णलता म्हणाल्या की त्यांना मुलाचा शेवटचा मेसेज शनिवारी रात्री आला. ‘त्याने मला त्याच्या धाकट्या भावाची आणि वडिलांची काळजी घेण्यास सांगितले होते’, अशी माहिती स्वर्णलता यांनी दिली.
‘मेसेज पाहून मी घाबरले आणि त्याला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. त्यानंतर मी त्याच्या मित्राला फोन केला जो त्याची चौकशी करण्यासाठी गेला होता. त्याच्या मित्राने राहुल कुठे आहे याबद्दल विचारणा करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारले. त्यानंतर त्याने अचानक कॉल डिस्कनेक्ट केला. त्याने 10 मिनिटांनी मला फोन केला आणि सांगितले की माझ्या मुलाला रुग्णालयात नेले जात आहे’, असे त्या म्हणाल्या.
रविवारी दुपारी कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर स्वर्णलता म्हणाल्या की त्यांना घटनेची माहिती मिळाली. संस्थेत दाखल झाल्यावर राहुल सहा महिन्यांपासून वर्ग चुकवत असल्याची माहिती देण्यात आली मात्र प्रशासनाने आम्हाला याबद्दल आधी काहीही कळवले नाही आरोपही त्यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List