बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यामागे फडणवीस, मोदी, शहा यांचा मोठा हात; संजय राऊत यांची टीका
महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चालले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलत नाही हे चागलं काम आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मोठा हात आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बिनडोक लोक आहेत, ही त्यांची भूमिका आहे. हे वातावरण त्यांनी खराब केले आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. ते मुकपणे पदड्यामागून या सगळ्यांना उत्तेजन देत राहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं असेल तर आम्ही जाहीर पाठिंबा देऊ, फडणवीसांनी केलेल्या चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती. त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहे. कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला आणि त्या गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसांची पीछेहाट सुरू आहे, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चालले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलत नाही हे चागलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जातंय, मराठी संस्कृतीवर हल्ले होत आहेत. ही चांगली कामं असेल तर जरूर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे. औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात आम्ही सातत्याने हीच भूमिका मांडली आहे की, महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांच्या शौर्याचे हे प्रतीक आहे आणि ते रहायलाच पाहिजे. राज ठाकरे यांची लोकसभेत भूमिका पूर्णपणे वेगळी होती आणि ती भाजपची सोयीची होती. आताही मराठी माणसासाठी कुणाच्या कानफटात आवाज काढायचा असेल तर काढायलाच पाहिजे. ही भूमिका कोणत्या पक्षाचा नेता मांडतोय त्याच्याविषयी आमच्या मनात संदेह नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली, ती ज्या पद्धतीने मराठी माणसासाठी संघटन भाजपने तोडलं, उद्ध्वस्त केलं. हा मराठी माणसाच्या एकजूटीवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. यामुळे राज ठाकरे यांनी मनावर घेऊन कुणाला कानफटात मारायचं ठरवलं तर नक्कीच त्यांचं स्वागत. आम्ही तर आहोतच. पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस, अमित शहा. नरेंद्र मोदी यांचा मोठा हात आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी स्थापन केली. त्याची शकलं करून मुंबईवर व्यापारांचा ताबा रहावा म्हणून जे राजकारण झालं त्यात राज ठाकरे ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे. आम्ही सगळे खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वसनासाठी आणि प्रगतीसाठी काम करत आहोत. अशा वेळेला महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत, त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी घेऊ नये असे आमचे मत आहे असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List