हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुण्यात घडले दर्शन, ब्राह्मण व्यक्तीवर मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्याने विधिवत अंत्यसंस्कार
सर्वत्र हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवून राज्यात आणि देशात वातावरण कलुषित केले जात आहे. अशा वेळी पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीवर एका मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्याने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाच, दोन धर्मांमधील बंधुभावामुळे द्वेषाचे बीज पेरणाऱ्या राजकारण्यांना चपराक मिळाली आहे. कोरोनाकाळातही त्यांच्या संस्थेने विविध जाती-धर्माच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते.
पुण्यामध्ये उम्मत सामाजिक संस्था चालवणारे कॅण्टोन्मेंट मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संघटक जावेद खान हे सर्वधर्मीयांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतात. आजवर त्यांनी अनेकांचे विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेबाबत जावेद खान म्हणाले, काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी फोन केला. त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे (वय 70, रा. रास्ता पेठ) यांचे निधन झाले असून, त्यांना फक्त जयश्री किंकळे या एकट्याच भगिनी आहेत. त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का?
मला हा निरोप मिळताच, मी ससूनमधील डेड हाऊसमध्ये पोहोचलो. तिथे जयश्रीताई आणि पोलीस हवालदार होळकर भेटले. पंचनामा सुरू होता. संध्याकाळ होणार होती. चौकशी केली असता, मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती. मी जयश्रीताईंना म्हणालो, आपण अंत्यविधी करुयात, त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाही. आपण सकाळी करू. त्यांची विनंती आणि अश्रू मला सहन झाले नाहीत.
रमजान महिना सुरू असल्याने दुसऱ्या दिवशी आमची सर्वांत मोठी रमजान रात्र आणि नमाज मोठा धार्मिक दिवस होता. असे सांगून जावेद खान म्हणाले, माझ्या मनात विचार आला की हे कार्य करण्यासाठी अल्लाहने तुला निवडले असेल कदाचित. जात-धर्म बाजूला ठेवून, सगळी कामे बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले. मी वैकुंठमध्ये पोहोचलो. तिथे आम्ही सगळेच सुधीर काकांचे नातेवाईक झालो आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List