आयुर्मान संपलेल्या 72 बसेस स्क्रॅप करणार, शिवनेरी, शिवशाही बसेसचा समावेश
आयुर्मान संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बसेस स्क्रॅप करण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे. शुक्रवारी (दि.21) या बसचा लिलाव करण्यात येणार आहे.
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर सुरक्षात्मक यंत्रणेचा अभाव समोर आला. त्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व बसस्थानकांतील आयुर्मान संपलेल्या आणि नादुरुस्त बस 15 एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात एसटी महामंडळाच्या 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत. या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून, बसमधील साहित्याच्या चोरीसारख्या घटना घडल्या आहेत. त्यातच नादुरुस्त बसचा गैरवापर होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने बस दाखल होण्यास सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत 30 पर्यावरणपूरक ‘शिवाई’ बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने 21 मार्चला आयुर्मान संपलेल्या 72 बस लिलाव प्रक्रियेद्वारे मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (एमएसटीसी) हे अधिकृत संकेतस्थळ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर जाऊन बसची माहिती आणि संख्येची माहिती स्पष्ट करून निविदा भरण्यात येते. त्यानंतर शासनाने निवडलेल्याच अधिकृत एजन्सी किंवा खरेदीदारांना लिलावामध्ये समाविष्ट करून घेतले जाते. लिलाव करताना या बसमधील सुट्टे भाग म्हणजे आसन, लोखंड, इंजिन, ऑईल, पत्रा, चाक, इलेक्ट्रीक साहित्य आदींची बोली लावली जाते किंवा आहे त्या अवस्थेतील बससाठी बोली लावली जाते. त्यानुसार सर्वाधिक बोली लावणाऱ्या खरेदीदाराला बस दिली जाते. ठराविक मुदतीनुसार संबंधित बस घेऊन जात त्या मोडीत काढल्या जातात.
आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढण्याची नियमित चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार आता जुन्या आणि संचलनातून बाद झालेल्या ७२ बसेस स्क्रॅप केल्या जाणार असून, त्याचा शासनाच्या नियमानुसार त्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रण, एसटी, पुणे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List