विरोधी पक्षनेते पदासाठी 10 टक्के सदस्यांची अट नाही, सात आमदारांच्या जोरावर शेकापचे डी. बी. पाटील यांची झाली होती निवड
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याविना पार पडले. विरोधी पक्षनेता होण्यासाठी दहा टक्के सदस्यांची अट असल्याचे सांगण्यात येते; पण अशी कोणतीही अट नाही. महायुतीचे नेते महाराष्ट्रात फेक नॅरेटिव्ह करण्याच्या प्रयत्नात आहेत; कारण 1972 मध्ये शेकापचे दिनकर पाटील हे केवळ सात आमदारांच्या संख्याबळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले होते याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना करून दिली आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेनेच्या वतीने भास्कर जाधव यांच्या नावाच्या शिफारसीचे पत्र अध्यक्षांना दिले आहे; पण संपूर्ण अधिवेशनात यावर निर्णय घेण्यात आला नाही. विरोधी पक्षनेता निवडीसाठी कायद्यात व नियमात काय तरतुदी आहेत याची माहिती घेण्यासाठी भास्कर जाधव यांनी मागील वर्षीच 29 नोव्हेंबर रोजी विधिमंडळ सचिवालयाला पत्र दिले होते. त्यानंतर विधिमंडळाने कायद्यातील सर्व तरतुदी तपासून 9 डिसेंबर रोजी भास्कर जाधव यांना उत्तर दिले. विरोधी पक्षनेता निवडीसाठी कायद्यात सदस्य संख्येची अट नाही. प्रथा आणि परंपरेप्रमाणे सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा सदस्य विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता म्हणून निवड करावी असे पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
या अधिवेशनात विधानसभा उपाध्यक्षांची निवड झाली, पण विरोधी पक्षनेता निवडला नाही. या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांचा महाराष्ट्रात फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणाले. वीसपेक्षा कमी आमदार असणाऱया पक्षांचे नेते विरोधी पक्ष नेते झालेले आहेत असे सांगत, कमी संख्याबळावरही विरोधी पक्ष नेत्याची कशी निवड झाली त्याची 1962 पासून 1990 या काळातील उदाहरणेच दिली.
वर्ष-पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांची नावे
- 1962 ते 1967 शेकापचे कृष्णराव धुळप फक्त 15 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले
- 1967 ते 1972 मध्ये कृष्णराव धुळप हेच 19 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले.
- 1972 ते 1977 मध्ये शेकापचे दिनकर बाळू पाटील हे फक्त सात आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले
- 1977 ते 1978 मध्ये शेकापचे आमदार गणपतराव देशमुख हे तेरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते.
- 1981-82 मध्ये जनता पार्टीचे बबनराव ढाकणे हे सतरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते.
- 1982-83 मध्ये शेकापचे आमदार दिनकर बाळू पाटील हे नऊ आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते.
- 1986-87 मध्ये जनता पार्टीचे आमदार निहाल अहमद हे सतरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले.
- 1987-88 मध्ये शेकापचे अॅड. दत्ता पाटील हे तेरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते.
- 1988-89 मध्ये जनता पार्टीच्या आमदार मृणाल गोरे या वीस आमदार असताना विरोधी पक्षनेत्या झाल्या होत्या.
- 1989-90मध्ये शेकापचे दत्ता पाटील हे तेरा आमदार असताना विरोधी पक्ष नेते झाले होते.
विरोधी पक्षाला समान दर्जा देण्याची महाराष्ट्राची चाळीस वर्षांची प्रथा-परंपरा आहे. या प्रथेला तडा जाऊ नये अशी आमची अपेक्षा होती. – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार असताना 70 पैकी 67 आमदार आपचे होते. भाजपचे फक्त तीन आमदार होते. तरीही आपने भाजपला विरोधी पक्ष नेते पद दिले होते. याचा अर्थ लोकशाहीची सभ्यता राखायची ठरले तर विरोधी पक्ष नेते पद देता येते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व आप पक्षाने ते केले आहे. पण ज्यांना सभ्यता राखायचीच नसेल तर काही कारणे काढली जातात. – भास्कर जाधव, शिवसेनेचे गट नेते
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List