दिल्ली डायरी – ‘बसपा’चा भरकटलेला ‘ऐरावत’
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून मायावतींनी कायमच भाजपला पूरक राजकारण केले. गेल्या दहा वर्षांपासून मायावती आणि बसपा शरणागत राजकारणात अडकला आहे. अलीकडेच त्यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांना हटवून आपले विश्वासू रामजी गौतम आणि रणधीर बेनीवाल यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक बनवून धुरा सोपवली आहे. या बदलाचा कितपत फायदा होतो हे भविष्यात समजेल. मात्र उत्तरेच्या राजकारणात एकेकाळी दबदबा निर्माण करणाऱ्या मायावती यांच्या ‘बसपा’चा ‘ऐरावत’ सध्या भरकटला आहे, हे नक्की.
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावतींनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांना नुकताच पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. आपले विश्वासू रामजी गौतम व रणधीर बेनिवाल या दोघांना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे. त्यामुळे मायावती सध्या चर्चेत आहेत. त्याचबरोबर यापुढे बसपाच्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही वर्गणी न घेण्याचा महत्त्वाचा निर्णयही मायावतींनी जाहीर केला आहे. मायावती एकेकाळी डेअरडेव्हिल होत्या. उत्तर प्रदेशमधील उपेक्षित बहुजन समाजात मायावतींची अशीच क्रेझ होती. ‘हमारी बेटी भी मायावती जैसी बने’ अशी सार्वत्रिक भावना होती. मात्र या धडाकेबाज मायावती केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर एकदमच ‘शरणागत’ झाल्या.
एकेकाळी ‘बसपा’चे पालनपोषण करण्यासाठी कांशीराम यांनी वणवण भटकून पै-पै गोळा करून त्या पक्षाची पाळेमुळे रुजवली. त्याच पक्षाने आता कार्यकर्ता वगर्णीचा मोह सोडला आहे. ‘तिलक, तराजू और तलवार इनको मारो जुते चार’ अशी घोषणा देत कांशीराम यांनी त्या काळात ब्राह्मण, बनिया व क्षत्रियांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले होते. मायावतींच्या राजकीय आयुष्यात सतीशचंद्र मिश्रा नावाचे चाणक्य आल्यानंतर याच ‘ऐरावता’च्या सोंडेतून ‘ब्राह्मण शंख बजायेगा, हाथी आगे जायेगा’ ही घोषणा आली. याच मिश्रांनी उत्तर प्रदेशमध्ये इतिहास घडवत ब्राह्मण-दलित व्होट बँकेची आघाडी करत उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमताने मायावतींना सत्तासिंहासनावर बसवले. मायावतींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा उत्तर प्रदेशच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. राजाभैयासारख्या बाहुबलीला फरफटत तुरुंगात डांबण्याची मर्दानगी मायावतींनी करून दाखवली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशमध्ये त्या काळात आदर्शवत स्थिती होती. मायावती आता पुढच्या पंतप्रधान होतीलच, असे वातावरण असतानाच अचानक देशात मोदी लाट आली आणि त्या वावटळीत मायावतींचा हत्ती भरकटला तो कायमचाच. पुढे मायावतींनी दिल्लीच्या सत्तेपुढे सपशेल शरणागती पत्करली. उत्तर प्रदेशसह पंजाब, हरयाणा, बिहारसह मध्य प्रदेशपर्यंत प्रभाव राखणाऱ्या मायावती स्वतःच बांधलेल्या आलिशान राजमहालात बंदिस्त झाल्या. पक्षाचा कारभार आकाश आनंद या आपल्या भाच्याकडे सोपवून त्या निर्धोक झाल्या. मात्र आकाश यांनी अगदी अल्पावधीतच पक्षाची वासलात लावल्यानंतर आता मायावती खडबडून जाग्या झाल्या आहेत. त्यांच्या पक्षातून आता सतीशचंद्र मिश्रा दूर झाले आहेत. गौतम व बेनिवाल या दोन विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने मायावती पुन्हा उत्तर प्रदेशच्या व राष्ट्रीय राजकारणात जम बसवू शकतील काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
भाविकांचे ‘लापतागंज’
महाकुंभाचा इव्हेंट पॉलिटिकल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत त्याच्या नावाने ‘श्रेयवादाचा शंखनाद’ केला. मोदींनी हुशारीने केलेले ते भाषण होते. या भाषणात मोदींनी एकदाही योगी आदित्यनाथ किंवा उत्तर प्रदेश सरकारचा उल्लेख जसा केला नाही तसाच महाकुंभात सरकारच्या अपयशी व्यवस्थेमुळे मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचीही आठवण काढली नाही. कारण या दोन्ही बाबी मोदींसाठी अडचणीच्या होत्या. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाकुंभामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा. महाकुंभामध्ये असे काहीच घडले नाही, असे ढोंग सुरुवातीला सरकारने रचले होते. 12 तासांनंतर महाकुंभामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे सरकारने कसेबसे कबूल केले. मीडियाला फुटेज दाखविण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर एव्हाना सगळे चित्र आल्याने सरकारची पुरती लायकी निघाली. महाकुंभानंतर योगी व मोदींविरोधातही हिंदुत्ववाद्यांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने पवित्र कुंभाचा इव्हेंट या लोकांनी केला, त्यात अनेकांचे प्राण गेले, त्यावर जनमानस क्षुब्ध आहे. ‘‘कुंभातील मृतांना मोदींनी श्रद्धांजली का वाहिली नाही’’ असा रोकडा सवाल राहुल गांधींनी केला, तर कुंभात किमान हजार लोक दगावल्याचे सांगितले जाते, सरकारी आकड्यापेक्षा हा आकडा खूप मोठा आहे. ‘‘सरकार खरा आकडा का सांगत नाही?’’ असे विचारत अखिलेश यादवांनी सरकारची गोची केली.
थरुरांचा गुरूर
शशी थरूर सध्या काँग्रेसमध्ये राहून भाजपचे गुणगान करीत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलेले आहे. हे महाशय जितके महिला वर्गात लोकप्रिय आहेत, तितकेच ते सध्या डावे आणि उजवे अशा दोघांचेही ‘डार्लिंग’ बनले आहेत. मोदींच्या युक्रेनबाबतच्या परराष्ट्रनीतीचे ते दिवाने वगैरे झाले आहेत, तर त्याच वेळी ते केरळचे मुख्यमंत्री विजयन यांचीही तारीफ करत आहेत. काँग्रेसच्या कार्यपद्धतीत बदल करावा यासाठी पत्राचार करणाऱ्यांपैकी थरूर एक होते. त्यामुळे साहजिकच हायकमांडच्या मनातून काहीसे उतरलेले. अडीच वर्षांनंतर राहुल गांधी यांनी त्यांना भेटीची वेळ दिली. काँग्रेसने आपल्याला केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र काँग्रेस हायकमांडने त्याला केराची टोपली दाखविली. तेव्हापासून थरूर यांनी ‘मोदी स्तुतीची गिटार’ हाती धरली आहे. त्याच वेळी ते डाव्यांनाही डोळा मारत आहेत. विजयन, प्रकाश कारत हे कडवे डावेही थरूर यांच्या सध्या प्रेमात आहेत. दुसरीकडे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची थरूर यांचा प्रयत्न आहे. केरळात भाजप सत्तेवर येणार नाही. मात्र हरलो तरी केंद्रात मंत्रीपद घ्यायचे आणि सुनंदा पुष्कर प्रकरणाचा फासही तोडून टाकायचा. तसेही भाजपकडे असे वॉशिंग मशीन आहेच. त्यामुळे थरुरांची पावले सध्या भाजपच्या दिशेने पडत आहेत. मात्र त्यात एक अडथळा आहेत ते म्हणजे राजीव चंद्रशेखर. माजी केंद्रीय मंत्री असलेले राजीव हे मोठे उद्योगपती आहेत. थरूर यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा लढवली व अवघ्या सोळा हजारांनी ते पराभूत झाले. थरूर यांच्या इतकेच ते केरळात लोकप्रिय आहेत. चंद्रशेखर हे येत्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील. त्या स्थितीत थरूर यांचा केरळच्या राजकारणात तरी त्यांच्यापुढे टिकाव लागणार नाही. त्यामुळे ‘थरूर का गुरूर’ काय रंग आणतो ते बघावे लागेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List