Kunal Kamra कोणताही छुपा हेतू नाही! ‘गद्दार’ विडंबनावर प्रशांत किशोर यांचा कुणाल कामराला पाठिंबा
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या ‘मेरी नजर से देखो गद्दार नजर वो आए’ या विडंबन गीतावरून सुरू असलेली चर्चा अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. कुणाल कामरा याने विडंबन गीतामध्ये कुणाचे नाव घेतलेले नाही. मात्र मिंधे गटाला हे विडंबन गीत चांगलेच झोंबले आणि त्यांनी संबंधित स्टुडीओची तोडफोड केली. त्यानंतर वाद आणखीनच पेटला. आता बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांना टक्कर देऊ पाहणारे माजी निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी या विषयावर भाष्य केले आहे. त्यांनी कुणाल कामरा याला पाठिंबा देत म्हटले की कुणाल राजकारणात नाही किंवा त्याचा ‘गुप्त हेतू’ नाही.
‘कुणाल कामरा माझा मित्र आहे’, असे प्रशांत किशोर म्हणाले. तसेच कामराने केलेल्या विडंबनामुळे ‘वाद निर्माण झाला’ हे देखील मान्य केले.
‘मी त्याला ओळखतो, त्याचा कोणताही गुप्त हेतू नाही. कुणाला वाटत असेल की तो राजकारण खेळत आहेत – तर तो असे काहीही करणार नाही’, असे ते पुढे म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले की, कामरा पॉन्डिचेरीमध्ये राहतो,सेंद्रिय शेती करतो. सोबत स्टँड-अप-कॉमेडी करतो. तो कुणाचाही राजकीय शत्रू नाही. तो देशावर प्रेम करणाऱ्यांपैकी एक आहे. कदाचित त्याने शब्द चुकीचे निवडले असतील. जर त्याने तसे केले असेल तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण माझं मत आहे की तो देश आणि देशाच्या संविधानाचा आदर करतो’.
कामरा याने म्हटलेले विडंबन गीत ‘गद्दार’ प्रचंड व्हायरल झाले. त्या गीताला प्रतिसाद मिळाला मात्र दुखावलेला मिंधे चांगलाच आक्रमक झाला. त्याच्याविरुद्ध पोलिसात खटले दाखल करण्यात आले आहेत. संबंधित शोच्या जागेची तोडफोड करण्यात आली आहे आणि त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत.
शुक्रवारी, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या संदर्भात कामरा याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List