मोदी म्हणतात… गुलामगिरीच्या बेड्या आम्ही तोडल्या, 11 वर्षांत प्रथमच पंतप्रधान संघ मुख्यालयात
पंतप्रधानांनी आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारक स्मृती मंदिरात जाऊन त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.
हिंदुस्थान आता गुलामगिरीची मानसिकता सोडून पुढे जातोय. राष्ट्रगौरवाचे नवे अध्याय लिहिले जात असून गुलामगिरीच्या विचाराने इंग्रजांनी बनवलेली दंड संहिता आता न्याय संहिता बनली आहे. देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून गुलामगिरीच्या या बेडय़ा आम्ही तोडल्या. आपल्या लोकशाहीच्या प्रांगणात आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ आहे. हा केवळ नावाचाच नाही तर मानसिकतेतील बदलही आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर येथील कार्यक्रमात केले. ते 11 वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय केशव पुंज येथे आले होते.
यावेळी त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवतदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आरएसएसच्या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन केले. त्यानंतर केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा इतिहास, भक्ती आंदोलनातील संतांची भूमिका, संघाची निःस्वार्थ कार्यप्रणाली. देशाचा विकास. युवकांमधील धर्म आणि संस्कृती, आरोग्य सेवांचा विस्तार, शिक्षण आणि प्रयागराज महाकुंभ यावर भाष्य केले.
दीक्षाभूमीला भेट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला भेट दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो. या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक सौहार्द, समता आणि न्यायाचे तत्त्व अनुभवता येते. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंना समान हक्क आणि न्याय देणारी व्यवस्था घेऊन पुढे जाण्याची उैर्जा देते, असे मोदी म्हणाले.
नौदलाच्या ध्वजातील गुलामीचे चिन्ह बदलले
आपल्या नौदलाच्या ध्वजातही गुलामीचे चिन्ह होते. त्याजागी आता नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिक आहे, असेही मोदी म्हणाले. अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासासाठी यातना भोगल्या, जेथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. त्या बेटांची नावे आता स्वातंत्र्यसैनिकांची आठवण म्हणून ठेवली गेली आहेत. हा नवा हिंदुस्थान गुलामगिरीच्या बेडय़ा मागे सोडून राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दिशेने पुढे जात आहे, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List