‘तू खूप जाड आहेस ऐकून मी…’ वजनावरुन ट्रोल होणारी अभिनेत्री होती डिप्रेशनमध्ये
बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ट्रोल केलंच जातं. पण काही कलाकार याकडे दुर्लक्ष करतात तर काही प्रतिक्रिया देतात. अशीच एक अभिनेत्री आहे जी ट्रोलिंगमुळे प्रचंड वैतागली होती. ती अभिनेत्री म्हणजे आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्टेड असते.
वजनावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागला
श्रुती मराठेला अनेकदा तिच्या वजनावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं. तिच्या वाढत्या वजनावरून तिला सोशल मीडियावर नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला आलेल्या मानसिक तणावाबद्दल तिने मोकळेपणानेच सांगितलं. अनेक वर्षे लोक तिच्या वजनावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते, त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास झाला. त्यानंतर तिने याबद्दल स्वत:मध्ये काही बदल घडवून आणले.
“लोक तुमच्या शरीरावर सतत टीका करतात”
श्रुतीने याबद्दल प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, “लोक तुमच्या शरीरावर सतत टीका करतात. एक काळ असा होता की, लोक म्हणायचे, तू खूप जाड आहेस आणि त्यामुळे मी तणावात यायचे. पण आता जेव्हा लोक म्हणतात, किती बारीक झाली आहेस, तेव्हा मला खरंच मजा वाटते. कारण, 15-20 वर्षे मी फक्त ‘जाड आहेस’ हेच ऐकत आले आहे.” असं म्हणत तिने तिला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल स्पष्टच सांगितलं.
“लोक सरळ तुमच्या शरीरावरच कमेंट करतात”
ती पुढे म्हणाली, “तुम्हाला आतून काय वाटतंय, तुम्हाला काही समस्या आहेत का, याचा विचार न करता लोक सरळ तुमच्या शरीरावरच कमेंट करतात. याचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मात्र, आता मी या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेते” असं म्हणत तिने आता ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायचं ठरवल्याचं तिने म्हटलं आहे. तसेच वजनारून कधीही स्वत:ला कधीही कमी लेखू नका, मग ते बारीक असो वा जाड. स्वत:वर प्रेम करा आणि आत्मविश्वास ठेवा, असा सल्ला श्रुतीने दिला आहे.
श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचं तर
दरम्यान श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने केवळ मराठीच नव्हे, तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘राधा ही बावरी’या लोकप्रिय मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘भागो मोहन प्यारे’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘एकापेक्षा एक’ अशा मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनेत्री असण्याबरोबरच श्रुती आता निर्माती देखील आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List