संस्कृती-सोहळा – सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभारी।।
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
वसंत ऋतूला कवेत घेऊन येणारा `गुढीपाडवा’ हा सणदेखील समाजमनाला चैतन्याची शिदोरी वाटतच येतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा. या तिथीला म्हणजेच गुढीपाडव्याच्या सणांपासून हिंदू संस्कृतीत नवसंवत्सराची सुरुवात होते. सृष्टीला चैतन्यदायी परीसस्पर्श देऊन नवजीवनाची हिरवीगार पालवी देणाऱया वसंत ऋतूचे स्वागत करीतच हा आनंदोत्सव साजरा केला जातो.
गुढी हे आनंदाचे जसे प्रतीक आहे, तसेच ती विजयाची निशाणीही आहे. जीवनात आनंद, सुखसमृद्धी व समाधान मिळवायचे असेल तर आपण विजयी व्हायला हवे. यशासारखे दुसरे यश नाही असे म्हणतात ते खरेच आहे. आजची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील परिस्थिती खूपच चिंतेची व चिंतनाची झाली आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या वेदोक्तीप्रमाणे सज्जनांचे रक्षण व्हावे आणि दुष्टांचा, दुर्जनांचा आणि हुकुमशाही दहशतवादाचा पराभव करून सज्जनांनी विजयी व्हावे, याकरिता संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात-
अधर्माची अवधी तोडी।
दोषांची लिहिली फाडी ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी।।
अधर्माचा नाश करून सज्जन ज्या वेळी विजयाची, सुखाची गुढी उभारितो, त्यावेळी खऱया अर्थाने या धरतीवर रामराज्य अवतरते. सज्जनांची सत्शक्ती आणि या सत्शक्तीचा संघटित आविष्कारच वैभवाची व समृध्दीची अर्थात विजयाची गुढी उभारील असा विश्वास संत ज्ञानोबा तुकोबांनी समस्त जनतेला दिला आहे.
गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा शुभारंभाचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. उत्सवप्रियतेचे प्रतीक. आनंदाचा व उत्साहाचा दिवस. यानिमित्ताने प्रत्येकाच्या दारात गुढी उभारून सुंदर कलात्मक रांगोळी रेखाटून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे व उल्हासाचे वातावरण असते. या दिवसात सृष्टी ही अद्भुत सौंदर्यांने नटलेली असते. त्यामुळे या सणाचे महत्त्व काही वैशिष्टय़पूर्ण व आगळेवेगळे आहे. सृष्टीला अभिजात चैतन्य देणाऱया वसंत ऋतूची नानाविध लोभसवाणी रूपे आपणाला या सणाच्या निमित्ताने पाहायला मिळतात. वृक्षांना नवपालवी फुटते. आम्रतरूला मोहर येतो. सृष्टीला चैतन्यदायी परीसस्पर्श देऊन नवजीवनाची हिरवीगार पालवी देणाऱया वसंत ऋतूचे आगमन होते.
नव्या वर्षाचा चैत्र महिन्यातील हा पहिला दिवस. यालाच `चैत्रपाडवा’ असेही म्हणतात. प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवासात राहून अयोध्येत परतले याचा आनंद म्हणून गुढय़ा उभारून त्यांचे लोकांनी स्वागत केले म्हणून हा दिवस साजरा करतात, अशी कथा सांगितली जाते.
चैत्रातला हा पहिला दिवस अर्थात नवीन युगाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, एवढेच नाही तर अलीकडे परदेशातही गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जातो. या सणाला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे दिली आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात याला `युगादी’ असे म्हणतात. राजस्थानात `थपना’, सिंध प्रांतात `चेटी चंड’, मणिपूरमध्येही नवीन वर्षाचा दिवस, तर पंजाबमध्ये `बैसाखी’ तामीळनाडूमध्ये `पुथांडू’, केरळमध्ये `विशु’ म्हणतात.
असे असले तरी गुढी मात्र बहुधा फक्त महाराष्ट्रातच उभारली जाते. गुढी ही काठीवर जरीचे वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे ठेवून, कडूनिंबाचा पाला बांधून, साखरेच्या गाठीची माळ अडकवून तयार केली जाते. कुटुंबप्रमुख कुलाचार म्हणून घरच्या देवांची पूजा झाल्यावर गुढीची पूजा करून ती सूर्याच्या दिशेकडे बांधतो. सभोवती कलात्मक रांगोळी रेखाटली जाते. कुटुंबातील मंडळी गुढीला पंचारतीने ओवाळतात व मनोभावे नमस्कार करतात. दिवसभर नृत्य संगीतात मश्गूल होतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, गोडधोड पदार्थ करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. सूर्यास्तानंतर गुढी उतरवली जाते. पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात कडुनिबांची पाने, जिरे, ओवा, गूळ याच्याबरोबर वाटून खाण्याची पद्धत आहे. कारण यामुळे वर्षभर आपले आरोग्य चांगले राहते अशी समजूत आहे.
आपण सगळ्यांनी मात्र या नव्या वर्षाच्या नव्या दिवसाचा वेगळ्या प्रकारे विचार करण्याची खरोखरच गरज आहे. चैत्रात फुललेली झाडे, नवी पालवी वर्षभर टिकावी, तिने आपल्याला सावली द्यावी यासाठी वृक्षतोड थांबविण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. प्रदूषणामुळे झाडांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रदूषण होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे. स्वच्छता ठेवण्यासाठी सगळ्यांचेच हात पुढे सरसावले पाहिजेत. वैशाखात होणारी ग्रीष्माची होरपळ, अनियमित पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, ढगफुटी हे सगळे टाळायचे असेल तर त्याची सुरुवात आपल्याला चैत्रातल्या पहिल्या दिवसापासून संकल्प करूनच करायला हवी. हे संकल्प सार्वजनिक जीवनात संघटित होऊन, समूहाने करण्याची गरज आहे. आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल करण्याची गरज आहे.
मनुष्य हा मुळातच उत्सवप्रिय आहे. बहुतेक उत्सवांचे बाह्यस्वरूप जरी धार्मिक वाटत असले तरी त्यांच्या अंतकरणात समाज हित व जनहिताचा उद्देश सामावलेला असतो. उत्सव म्हटले की, आनंद आला, उल्हास आला, उत्साह आला आणि यासाठी मनोरंजनही आले. आज जग झपाटय़ाने बदलत आहे. मनोरंजनाची असंख्य साधने माणसाच्या हाती आली आहेत. दैनंदिन जीवनातील वाढती स्पर्धा, जगण्यासाठीचा संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. तरीही त्याची उत्सवप्रिय मानसिकता तसूभरही कमी झालेली नाही. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे या जगण्याच्या प्रािढयेतील चिंता, व्यथा, स्पर्धा, संघर्ष, हेवेदावे, दु:ख, अशांती, भय हे सर्व काही काळ का होईना त्याचा विसर तरी पडतो. मनाला एक प्रकारचा सात्त्विक आनंद व समाधान मिळतो. सद्यस्थितीत या वसंताचे चैतन्य प्रत्येक माणसाच्या मनामनाला लाभायला हवे.
समाजपुरुषाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी वातावरणातील चैतन्यदायी स्पर्श लाभायला हवा आणि मानवी जीवनासाठी तसेच सृष्टीच्या संवर्धनासाठी सज्जनांकरवी कर्तृत्वाची, कर्तव्याची, विधायकतेची अन् सुखसमृद्धीची गुढी उभारायला हवी!
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List