महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत सरकारचे आकडे खोटे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांचे परखड मत
महाराष्ट्रात उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीबाबत, परकीय गुंतवणुकीविषयी राज्य सरकारकडून देण्यात येणारे आकडे सपशेल खोटे आहेत, असे परखड मत ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी मांडले आहे. उद्योगधंदे, व्यावसाय करण्याच्या उद्देशाने लोक पुण्यात येऊन चर्चा करतात. प्रत्यक्षात मात्र उद्योग चेन्नई आणि गुजरातमध्ये जात असल्याचे चित्र आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सहजीवन व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राचे उत्पन्न 100 लाख कोटी कसे होईल?’ या विषयावर फिरोदिया बोलत होते. यावेळी बाल्झर पंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी प्रवीण शिरसे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, जयश्री फिरोदिया, अलका पटवर्धन, गोपाळ चिंतल, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, नाशिकमध्ये सरकारी विमान कंपनीचा कारखाना आहे. मात्र, एअरबस कंपनी गुजरातला गेली. महाराष्ट्रातील गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकते. मात्र, त्यासाठी ठोस उपाययोजना आणि प्रयत्न करणे गरजेचे आहे. विसाव्या शतकात आशियातील सर्वात प्रगत शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मात्र, सिंगापूरने मुंबईला मागे टाकले आहे.
महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी नवी मुंबईजवळ जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा असणारे एक नवे शहर वसविण्याची गरज आहे. गोव्याप्रमाणे परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुहागरसारखी आठ शहरे विकसित करावी लागतील. तसेच, धार्मिक पर्यटनाबरोबर मेडिकल टुरिझम सुरू करण्यावर राज्य सरकारने भर देण्याची गरज आहे, असे ही फिरोदिया म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List