गीताबोध – भोगी आणि योगी…
>> गुरुनाथ तेंडुलकर
मागील लेखात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बोध करण्याच्या निमित्ताने एक त्रिकालाबाधित सत्य सांगितलं ‘केवळ कर्मावर तुझा अधिकार आहे. त्या कर्मातून मिळणाऱया फळावर तुझा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. म्हणून तू फळाची अपेक्षा न ठेवता तुझं कर्म कर…’ (कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।।) या लेखावर अनेक जणांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. एका विद्यार्थ्याने विचारलं की, ‘अभ्यास हे कर्म आणि परीक्षेत चांगले मार्क हे त्याचं फळ आहे. जर चांगल्या मार्कांनी पास होण्याची खात्री नसेल, तर अभ्यास करायचाच कशाला?’ ‘दुसऱया एकाने विचारलं की ‘दररोज कामावर जाणं हे कर्म असेल, तर महिनाअखेरीला मिळणारा पगार हे त्याचं फळ आहे. जर नोकरी करून पगार मिळणारच नसेल, तर नोकरी तरी कशासाठी करायची? यासारखे, अशाच प्रकारचे इतरही अनेक प्रश्न अनेकांनी विचारले आहेत. त्या सगळ्यांना ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या भगवान श्रीकृष्णांच्या वचनाचा नेमका अर्थ बहुतेक कळलेला नसावा.
‘कर्म करूनही तुला फळ कधीच मिळणार नाही’ असं भगवान श्रीकृष्ण असं कधीही म्हणत नाहीत. ते म्हणतात की ‘तू कर्म कर…. फळ आपोआप मिळेल. तुला नेमून दिलेलं कर्म उत्तम प्रकारे करणं ही एकच गोष्ट तुझ्या हातात आहे. तुझ्या अधिकारातली आहे. बाकी फळ मिळणं किंवा न मिळणं तुझ्या अधिकाराच्या कक्षेत येत नाही.’ नीट ध्यानात घ्या. भगवान श्रीकृष्ण कुठेही असं म्हणत नाहीत की ‘फळ मिळणारच नाही तरी तू तुझं कर्म कर… ते म्हणतात की ‘केवळ फळाच्या अपेक्षेने कर्म करू नकोस. फळ आपोआपच मिळेल.’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हा हातात पहिल्यांदा बॅट घेऊन मैदानात उतरला त्यावेळी त्याने आपण शतकांचं शतक साजरं करणार आहोत या अपेक्षेने उतरला नव्हता. पुढे भारतरत्न हा सर्वोच्च किताब मिळेल या अपेक्षेने उतरला नव्हता. सचिन एकेक मॅच खेळत गेला. स्वतच्या खेळावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक दिवशी आपला खेळ अधिकाधिक चांगला कसा होईल याचा विचार करत खेळात सुधारणा करतच राहिला. अनेक प्रकारच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवून, अनेक दुखण्यांवर मात करून आणि अनेक प्रलोभनांकडे पाठ फिरवून खेळत राहिला आणि परिणामी सचिन तेंडुलकर हा एकमेव आणि अद्वितीय दर्जाचा फलंदाज ठरला. जगज्जेता बनला.
कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म करीत रहा असं भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकांतून थोड्या अधिक विस्ताराने सांगतात.
योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यासिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।। 48 ।।
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय ।
बुद्धौ शरणम् अन्व्चिछ कृपणाः फळहेतव ।। 49 ।।
बुद्धियोक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्मात् योगाय युजस्व योग कर्मसु कौशलम् ।। 50 ।।
हे धनंजया, संगं त्यक्त्वा सिद्ध्यसिद्ध्योः सम भूत्वा योगस्थ कर्माणि कुरु । समत्वं हि योग उच्यते । 2 – 48
हे धनंजय बुद्धियोगात् कर्म दूरेण हि अवरम् । त्वं बुद्धौ शरणं अन्विच्छा । फलहेतव कृपणाः । 2 – 49
बुद्धियुक्त इह सुकृतदुष्कृते उभे जहाति। तस्मात योगाय युजस्व। कर्मसु कौशलं योग । 2 – 50
भावार्थ – हे धनंजया, हे अर्जुना, कर्मफलाची आसक्ती सोडून आणि यश-अपयशाविषयी समबुद्धी ठेवून योगयुक्त कर्मे कर. अशा प्रकारे समत्वबुद्धीने केलेल्या कर्मांनाच योग असं म्हणतात. हे धनंजया, हे अर्जुना, समत्वरूप बुद्धियोगापेक्षा बाह्यकर्म फारच कनिष्ठ दर्जाचं आहे. म्हणून तू समत्वबुद्धीच्या आश्रयाला शरण जा. कारण केवळ फलाकडे दृष्टी ठेवून काम करणारे लोक कृपण बुद्धीचे, दीन आणि हीन दर्जाचे असतात. जो साम्यबुद्धीने युक्त झाला तो पाप आणि पुण्य दोघांचाही त्याग करतो. म्हणूनच तू बुद्धियोग संपादन करण्यास सिद्ध हो. कर्माचरणात समत्वबुद्धीरूप योग साधणे हेच खरे कौशल्य आहे.
आपण सर्वसामान्यत जे काम करतो त्या कामापासून काहीतरी मिळवण्याची इच्छा मनात ठेवूनच ते काम करायला सुरुवात करतो. किंबहुना, सुरुवातीपासूनच कामापेक्षाही कामातून मिळणाऱया मोबदल्याकडे आपलं लक्ष जास्त असतं. अशा लोकांना उद्देशून भगवान श्रीकृष्ण एक शब्द वापरतात कृपण! कृपण म्हणजे दीन… एखाद्याकडे आशाळभूतपणे पाहणारा, दीनवाणेपणाने आपल्याला काय मिळेल याकडे सगळं लक्ष ठेवणारा… अशा प्रकारच्या माणसाला मिळाला तर केवळ त्या कामाचा थोडासा मोबदलाच मिळतो. त्या कामापासून मिळणारे इतर फायदे मिळत नाहीत आणि कामातून मिळणारा आनंद तर कधीच मिळत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावात शाळेसाठी इमारत बांधली जात होती. त्या राज्याचा राजा वेश पालटून तिथे पाहणी करण्यासाठी गेला. तिथे काही कामगार भिंत बांधायचं काम करत होते. राजाने एका कामगाराला विचारलं ‘काय करतो आहेस?’ ‘मजूरी करतोय. घरी तीन पोरं आहेत. त्यांची पोटं तर भरायला हवीत की नाय? घरी बायको मराया टेकलीय. त्यामुळे मलाच राबावं लागतंय. नशीबच फुटकं.’ तो मजूर करवादल्यासारखा उत्तरला. राजा आणखी एका कामगाराजवळ गेला आणि त्यालादेखील तोच प्रश्न विचारला, काय करतो आहेस? ‘काम करतोय. काम केलं नाय तर पैका कसा भेटंल? आणि पैका नाय भेटला तर घर कसं चालंल?’ राजाने अनेक कामगारांना तोच प्रश्न विचारला. प्रत्येकाने पैसे मिळवण्यासाठी काम करतोय असं उत्तर दिलं. पण एका कामगाराचं उत्तर मात्र इतरांहून भिन्न होतं. ‘महाराजांनी गावातल्या मुलांसाठी शाळा बांधाया घेतलीय. आता मुलांना नदी वलांडून पलीकडच्या गावात जावं लागणार नायी. हितं याच गावात साळा होतेय. साळा म्हंजे देवी सरोसतीचं मंदीरच म्हनायचं की. या देवळाच्या बांधकामात माजी सेवा रुजू होतेय हे माजं भाग्य.’ महाराजांनी ताबडतोब त्या मजुराला बढती देऊन इतर कामगारांवर देखरेख करण्यासाठी मुकादम म्हणून नेमणूक करायला लावली. त्याची मजूरी पाचपट वाढवली.
या गोष्टीतला ‘शाळा म्हंजे सरोसतीचं मंदीर’ म्हणणारा मजूर देखील तेच काम करत होता जे इतर मजूर काम करत होते. पण तो त्या सगळ्यांहून भिन्न होता. काम तेच असलं तरीही त्यामागे केवळ मजुरी मिळावी हा उद्देश नव्हता. इतर सर्व मजूर कृपण होते. दीन होते. भोगी होते. हा मजूर मात्र योगी होता.
पुन्हा एकदा ‘कर्मण्येवाधिकारस्ते‘कडे वळून सांगतो की केवळ परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यापुरताच अभ्यास करणाऱयाला विद्यार्थी म्हणता येत नाही. ते केवळ परिक्षार्थी असतात. मार्कार्थी असतात. जो ज्ञानसंपादनाच्या हेतूने विद्याभ्यास करतो तो विद्यार्थी. त्याला चांगले मार्क तर मिळतातच मिळतात, पण केवळ मार्क मिळवणं हा त्याचा एकमेव हेतू नसतो. मार्क मिळाले काय किंवा न मिळाले काय दोन्ही सारखंच, असं मानून जो ज्ञानसंपादनेसाठी अभ्यास करतो त्याला त्या अभ्यासाचं फळ पुढे आयुष्यभर मिळतं.
थोडक्यात सांगतो की, कोणत्याही प्रकारची फळाची आसक्ती न बाळगता, समत्वबुद्धीने आणि स्थिर चित्ताने कर्म करणं म्हणजे योग. अशा प्रकारच्या योगामुळेच कर्मात कुशलता प्राप्त होते आणि त्यानंतर मिळणारं फळ, हे फलाशा ठेवून केलेल्या कर्माहून कित्येकपटीने मोठं असतं हे मी स्वतच्या अनुभवावरून सांगू शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List