संस्कृती-बिंस्कृती – मानवी मूल्यांच्या विटंबनेची गोष्ट

संस्कृती-बिंस्कृती – मानवी मूल्यांच्या विटंबनेची गोष्ट

>> डॉ. मुकुंद कुळे

व्यासांचं महाभारत जसं सार्वकालिक आहे, तसंच धर्मवीर भारती यांचं `अंधा युग’ही.  हिंदीतील प्रसिद्ध लेखक-पत्रकार धर्मवीर भारती यांनी महाभारतातील युद्धअखेरीचा कथांश घेऊन लिहिलेले `अंधा युग’ हे नाटक आजच्या काळाला लागू होईल अशी परिस्थिती सध्या आहे.

आज देशात-राज्यात जी एकूण परिस्थिती आहे ती पाहता, या काळासाठी `अंधायुग’ हेच संबोधन योग्य राहील… कारण राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्वत्र अतिरेकी इच्छा-आकांक्षांच्या जिव्हा वळवळताना दिसत आहेत. साधनशुचितेचा कसलाही विधिनिषेध उरलेला नाही. एकप्रकारे प्रचंड अनागोंदी आणि दहशत सर्वत्र भरून राहिलेली आहे… आणि यावरूनच अगदी सहज आठवण होते ती हिंदीतील प्रसिद्ध लेखक-पत्रकार धर्मवीर भारती यांनी विसाव्या शतकातील पन्नास-साठच्या दशकात महाभारतातील युद्धअखेरीचा कथांश घेऊन लिहिलेल्या `अंधा युग’ या नाटकाची. अगदी आजच्या काळालाही ते नाटक तितकंच लागू होतं, जेवढं ते त्या काळाला लागू होतं. मात्र महाभारतावरील एका कथांशावर आधारित असलेलं `अंधा युग’ नाटकच नव्हे, तर संपूर्ण महाभारतच आजच्या काळाला लागू होईल अशी परिस्थिती सध्या आहे.

वास्तविक, रामायण-महाभारत, दोन्ही आर्ष महाकाव्यं. या दोन महाकाव्यांची तुलना अप्रस्तुतच. तरीही तुलना करायचीच झाली तर, काव्याच्या पातळीवर रामायण निसंशय अत्युत्कृष्ट ठरेल. पण जेव्हा जीवनानुभव पणाला लागेल, तेव्हा मात्र महाभारताशिवाय दुसरा पर्यायच नसेल. कारण मानवी भावनांचा-विचारांचा-वर्तणुकीचा आणि वृत्ती-प्रवृत्तींचा एकही कंगोरा महाभारताने अस्पर्श ठेवलेला नाही. `व्यासोच्छिष्टमं जगत् सर्वम्` म्हणजे व्यासांनी सारं जग उष्टावून ठेवलंय, असं उगीच नाही म्हणत! व्यासांनी अशी काही मेख मारून ठेवलीय की, कुणी काही पूर्णत नवीन निर्माण करूच शकणार नाही. प्रत्येक गोष्ट काळाला पुरून उरणारी… म्हणजे कथा महाभारतातली असली तरी त्याचे संदर्भ चालू काळाशी सहज जोडता येतात. ते कधीच जुने होणार नाहीत. म्हणूनच वि.स. खांडेकर `ययाती’सारखी कादंबरी लिहितात, तेव्हा ती फक्त पुराणकालीन कथा राहत नाही. ती सुखलोलुप-भोगलोलुप वृत्तीची निदर्शक होते. रत्नाकर मतकरी `बकासुर’सारखं नाटक लिहितात, तेव्हा ते विद्यमान दहशतवादाचं प्रतीक बनतं आणि धर्मवीर भारती `अंधायुग’सारखं नाटक लिहितात, तेव्हा त्यांनाही महाभारताचा दुवा वर्तमानाशीच जोडायचा असतो.

धर्मवीर भारती लिखित या `अंधा युग`चे प्रयोग आजवर पं. सत्यदेव दुबे यांच्यापासून ते इब्राहिम अल्काझी, मोहन महर्षी, एम. के. रैना, मणि कौल, रामगोपाल बजाज, रतन थियम, कमलाकर सोनटक्के यांसारख्या अनेक मान्यवर दिग्दर्शकांनी आपापल्या शैलीत आणि कश्मीरपासून केरळपर्यंत भारताच्या विविध भागांत केले. मात्र दिग्दर्शक कुणीही असो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक काळात `अंधायुग`चा प्रयोग म्हणजे समकाळावर केलेलं रोखठोक भाष्यच वाटलं. आताही कुणी पुन्हा याचा प्रयोग केला तरी ते आजच्या काळाचंच नाटक वाटेल. कारण महाभारतातील राजकीय द्वेष-विद्वेषाचे वारे आजही तसेच वाहत आहेत.

रामायण-महाभारताकडे भारतीय मानस, परंपरा आणि श्रद्धेच्या अवगुंठनातून पाहतं. त्यामुळे साहजिकच त्यातल्या पात्रांभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालेलं आहे. पण जेव्हा धर्मवीर भारती आणि एस. एल. भैरप्पा (पर्व) यांच्यासारखी मंडळी या गूढतेचा बुरखा फाडतात, तेव्हा या पौराणिक व्यक्तिरेखांमधून षड्रिपुंनी लडबडलेली सर्वसामान्य माणसंच बाहेर पडतात. धर्मवीर भारतींनी `अंधा युग’मध्ये हे काम अगदी चोख केलं आहे. या नाटकाचा एकूण अवकाश जेमतेम दीड दिवसाचा. कौरव-पांडवांत लढल्या गेलेल्या महाभारतीय युद्धाचा अठरावा दिवस आणि त्यानंतरचा साधारण अर्धा दिवस. हाच नाटकातला कालिक अवकाश. तर यातली रंगमंचावर अवतरणारी मुख्य पात्रं म्हणजे धृतराष्ट्र, गांधारी, विदुर, अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा, युयुत्सु आणि संजय. अश्वत्थामा सोडला तर एरव्ही बाकीची पात्रं नाटय़ात्मक ताण निर्माण करण्यासाठी तशी कुचकामीच; पण धर्मवीर भारती यांनी याच पात्रांच्या माध्यमातून महाभारतीय युद्ध आणि त्या युद्धाला कारणीभूत ठरलेले कृष्णासहीत सर्वजण एक आंधळा खेळ कसे खेळत होते, ते अधोरेखित केलं आहे आणि महाभारतीय युद्धाचा काळ `अंधा युग’ कसा होता ते दाखवलं आहे. हे आंधळेपण मायेचं-ममतेचं, प्रेमाचं-अधिकाराचं आणि स्वार्थाचंही. कौरवांपासून पांडवांपर्यंत सारे जण डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे झालेले. परिणामी स्व-पलीकडे बघायला कुणीच तयार नाही. अगदी कृष्णही. त्यालाही मोठेपणाचा अहंकार. म्हणून तर गांधारी त्याला म्हणते की- `कृष्ण सुनो! तुम यदि चाहते तो रुक सकता था यह युद्ध.’ म्हणजे प्रभू असलेल्या कृष्णालाही तटस्थ नाहीच राहता आलं. जर तो तटस्थ राहिला असता तर महाभारतीय युद्धातलं त्याचं अस्तित्वच निरर्थक ठरलं असतं.

`अंधा युग’मधील सगळय़ाच भूमिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. पुत्रनिधनामुळे संतापाने विवश झालेली गांधारी, सर्व भावंडांच्या विरोधात पांडवांच्या बाजूने लढणारा आणि वाचलेला एकमेव कौरव युयुत्सु (जो गांधारीसकट सर्व कुरू जनतेच्याही रागाचं कारण बनला आहे), दिव्यदृष्टी लाभलेला संजय, कृपाचार्य-कृतवर्मा आणि सगळय़ात महत्त्वाचा म्हणजे अश्वत्थामा. जो पित्याची व दुर्योधनाची अधर्माने हत्या करण्यात आली म्हणून चिडलेला आहे आणि त्यातूनच पांडवांची अधर्माने हत्या करण्याचा कट तो आखतो.

धर्मवीर भारती यांनी आपल्या या नाटकाला दिलेलं `अंधा युग’ हे नावच एवढं समर्पक होतं आणि आहे की, कोणत्याही काळात ते त्या-त्या काळाचंच नाटक वाटेल. विशेषत आजच्या काळात सत्ताधाऱयांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येकाने आपापल्या डोळय़ांवर जणू पट्टीच बांधून घेतल्यासारखी परिस्थिती आहे. मोजक्याच व्यक्तींची-संस्थांची दमनशाही सर्वच क्षेत्रांत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कुणीतरी पुन्हा एकदा `अंधा युग’, `बकासुर’ यांसारख्या नाटकांचे प्रयोग करायला हवेत. कारण ही नाटकं म्हणजे त्या-त्या नाटककाराने काळावर-परिस्थितीवर केलेलं भाष्य आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या आवारात नैसर्गिक रंगमंचावर झाडा-झुडपांच्या साथीने `अंधा युग’चा प्रयोग झाला होता. बंदिस्त रंगमंचाऐवजी खुल्या आकाशाखाली नैसर्गिक अवकाशात `अंधा युग’ सादर होण्याने त्या नाटकाची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढवली होती. अर्थात `अंधा युग’साठी असा मुक्त रंगमंच वापरण्याचा तो पहिला प्रयत्न नव्हता. त्याआधी प्रसिद्ध दिग्दर्शक इब्राहिम अल्काझी यांनी दिल्लीच्या जुन्या किल्ल्याचा काही भाग `अंधा युग’ नाटकासाठी रंगमंच म्हणून वापरला होता. त्यावेळी जुन्या किल्ल्याच्या भग्नावशेषांनी `अंधा युग’ला एक वेगळं परिमाणही मिळवून दिलं होतं, असं तो प्रयोग पाहिलेले जाणकार सांगतात. अर्थात मुंबई विद्यापीठाच्या अकादमी ऑफ थिएटर आर्टस्च्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रा. मिलिंद इनामदार यांनी दिग्दर्शित आणि डिझाइन केलेला `अंधा युग’चा प्रयोगही कल्पक आणि परिणामकारक होता.

अनेकार्थक्षमतेच्या एवढय़ा शक्यता या नाटकात दडलेल्या आहेत की, जेवढे नवनवीन दिग्दर्शक हे नाटक बसवतील, तेवढे त्याचे नानाविध पदर उलगडले जातील. त्यामुळेच `अंधा युग’ नाटक केवळ दिग्दर्शकच नाही, तर अनेक मान्यवर कलाकारांनाही आजवर आव्हान देत आलं आहे आणि ही सारी किमया `अंधा युग’ लिहिणाऱया धर्मवीर भारतींची आहे. महाभारत युद्धाचा वर्तमानाशी जुळलेला सांधा त्यांनी नेमका हेरला आणि समाजासमोर ठेवला. म्हणूनच आज `अंधा युग’ पाहताना किंवा वाचताना कृष्ण थेट एखाद्या सद्यकालीन राजकीय नेत्याप्रमाणे भासेल, जो आपल्या क्षमतेच्या-आवाक्याच्या पलीकडे जाऊन सारी सूत्रं आपल्याaच हाती ठेवू पाहतोय…

तेव्हा व्यासांचं महाभारत जसं सार्वकालिक आहे, तसंच धर्मवीर भारती यांचं `अंधा युग’ही! कारण दोन्ही कलाकृती मानवी मूल्यांच्या विटंबनेचीच गोष्ट सांगतात!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोणी घर देता का  घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार,  रेडीरेकनर दरांमध्ये वाढ कोणी घर देता का घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार, रेडीरेकनर दरांमध्ये वाढ
मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं, आणि याच शहरात आपलं एक तरी घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. करोडो...
‘मी जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तिथे..’; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोमणा
Disha Salian Case: दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नाही तर, पूर्वनियोजित मर्डर? ‘ते’ पेनड्राईव्ह, गँगरेप आणि हत्येचा दावा
IPL 2025 – मुंबईच्या विजयानंतरही हार्दिक पंड्या ट्रोल, एका चुकीमुळे 23 वर्षीय खेळाडूचा विक्रम हुकला; आता पुन्हा संधी नाही
शुभमंगल ‘सावधान’! महागाईमुळे लग्नावर होणार दुप्पट खर्च
CBSC कडून 10, 12 वीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल; गुणांएवजी ग्रेड पद्धती आणणार
Sikandar- भाईजानच्या ‘सिंकदर’चा प्रभाव पडला फिका! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप कमी!