लक्षवेधीसाठी किती पैसे हवेत, सत्ताधारी आमदारच अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना विचारत होते; विरोधी पक्षाने घेरले, भास्कर जाधवांचा बॉम्ब
सत्ताधारी पक्षाचेच आमदार विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना लक्षवेधीसाठी किती पैसे हवेत, असे विचारत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी केला. एवढेच नाही तर विधिमंडळाच्या कामकाजातील त्रुटींवर बोट ठेवत महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडेही त्यांनी काढले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत प्रचंड संख्येने लक्षवेधी सूचना लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी आज सरकारला चांगलेच धारेवर धरले. लक्षवेधी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांना म्हणतात की, आमची लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत सांगा, पण आमची लक्षवेधी लावा असे सांगत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे सत्ताधारी सदस्यांनी अस्वस्थ होत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा मुद्दा कामकाजातून काढून टाकण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली. त्यावर हे विधान तपासून घेतले जाईल, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले
विधान भवन प्रवेश पास 10 हजार रुपयांना
अधिवेशनकाळात विधान भवनाच्या प्रवेशासाठी पासची दहा हजार रुपयांना विक्री होत असल्याकडेही भास्कर जाधव यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत लक्ष वेधले. ‘जी-पे’ आणि ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून पैसे घेऊन विधान भवन पासची विक्री होत असल्याचे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List