महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीला शिवसैनिक, शिवप्रेमी ठोकल्याशिवाय राहणार नाहीत; संजय पवार यांचा इशारा
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या नागपुरच्या प्रशांत कोरटकरमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपासून ते आता अभिनेता राहुल सोलापूरकर ते कोरटकरपर्यंत काही विशिष्ट पक्ष आणि संघटनांशी संबंधित असलेल्या समाजकंटकांकडून महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे सत्र दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्यां विरोधात कडक कायदा करणे गरजेचे आहे, अन्यथा शिवसैनिक व शिवप्रेमी कायदा हातात घेऊन अशा नालायक प्रवृत्तीला ठोकल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरला न्यायालयातून कडक पोलीस बंदोबस्तात घेऊन जाताना शिवप्रेमी वकील अमित कुमार भोसले यांचा शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संजय पवार यांनी महापुरूषांची बदनामी सहन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले. संजय पवार म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचा वारंवार अपमान व अवमान होताना दिसत आहे. काही विघ्नसंतोषी मंडळी जी भाजपची अघोषित पिलावळ आहेत आणि जे भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात तीच मंडळी महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. त्यातीलच प्रशांत कोरटकर हा एक नालायक आहे.यावेळी हर्षल सुर्वे,अभिजीत बुकशेट आदी शिवसैनिकांसह शाहु सेनेचे शुभम शिरहट्टी आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List