दादा, क्या हुआ तेरा वादा? कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे: हर्षवर्धन सपकाळ.
जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता 31 मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण आजही लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच दिले जात आहेत. उलट 10 लाख बहिणींच्या नावांना कात्री लावत लाडकी बहिण योजनेतून बाद केले आहे. शेतकरी कर्जमाफीवर बजेटमध्ये एक शब्दही काढला नाही. ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी-शाह यांचे सतत गुणगाण गात असतात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पशेल पॅकेज घेऊन यावे, असेही सपकाळ म्हणाले.
मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग वाढला पण मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात या वर्गाचे कंबरडे मोडले आहे, लघू, छोटे व मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नाही तर जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला. उल्हासनगर सारख्या शहरातील या उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मुल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.
काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रीत करण्याचे आहे. 140 कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते पण भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उल्हास नगर, कल्याण डोंबिवलीला भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिब हटावची योजना राबवली, बांग्लादेशाची निर्मिती केली,बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तर राजीव गांधी यांनी पंचायत राज आणले, संगणक क्रांती आणली. डॉ. मनमोहनसिंह सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैसा कसा येईल यासाठी धोरणे आखली. प्रत्येक पंतप्रधानांनी काहीही ना काही योगदान दिले आहे पण आत्ताच्या पंतप्रधानांची ओळख खोटे बोलणारा, भांडणे लावणार अशी आहे. मोदींचा कारभार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’ असा आहे. आता आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई जीवन मरणाची आहे, ‘करो या मरो’ची आहे, त्यामुळे लढायची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List