‘शिवा’ मालिकेत अजब ट्विस्ट; आता सीताई दिसणार टॉमबॉय लूकमध्ये, वाजवणार शिट्टी, चालवणार बाईक
झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. शिवाच्या वेगळेपणाची लाज न बाळगता त्याला समाजासमोर सन्मानाने समोर आणण्याचं सीताई ठरवते. या निमित्ताने शिवा-सीताईच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू होत आहे. शिवा सीताईला स्वतः करत असलेल्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागते. शिट्टी कशी वाजवायची, बाईक कशी चालवायची, तिखट जेवण कसं खायचं.. अशा अनेक गोष्टी शिवा सीताईला शिकवतेय. सीताई या नव्या अनुभवांचा आनंद घेत आहे. पण हे सगळं पाहून कीर्ती अस्वस्थ होते आणि शिवा-सीताईमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, सीताई तिच्या थेट कानाखालीच वाजवते.
दुसरीकडे आशु आणि शिवाच्या भांडणामागे दिव्याचा हात असल्याचं समोर येतं. हे सत्य समोर येताच बाई आजी आणि वंदना संतापतात. बाई आजी दिव्याला घराबाहेर काढते. हे सर्व सुरु असताना प्रेक्षकांना मात्र सीताई आणि शिवाचं नातं पाहताना खूप मज्जा येणार आहे. सीताईची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी आपल्या नवीन लूकचा अनुभव सांगितला आहे.
“गेले वर्षभर मी सीताईची भूमिका साकारत आहे. शिवाच्या विरोधात उभी राहणारी, तिचा स्वीकार न करणारी, तिच्या पेहरावावर टीका करणारी.. अशी ही सीताई होती. पण आता मालिकेत अचानक एक ट्विस्ट येणार आहे. सीताई शिवाचा स्वीकार करणार आहे. तिचं खरं रूप समजून घेऊन सीताई एक प्रेमळ व्यक्ती, आई आणि सासू म्हणून शिवाच्या वेगळेपणाला आपलंसं करणार आहे. आम्ही दोघी मिळून खूप धमाल करणार आहोत”, असं त्या म्हणाल्या.
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “एरव्ही पारंपरिक पद्धतीनुसार वावरणारी सीताई आता शिवासारखी पँट आणि शर्टमध्ये दिसणार आहे. यासाठी मी शिट्टी वाजवायलाही शिकणार आहे. जेव्हा मी या लूकमध्ये तयार होऊन बाहेर पडले, तेव्हा येता जाता सेटवरील लोक थांबून मला बघत होते. प्रेक्षकांना हा एक छान सुखद धक्का भेट मिळणार आहे. मी आणि शिवाने सेम शर्ट घातले आहे. इतर वेळी शूटिंगदरम्यान सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. पण जेव्हा माझ्या एण्ट्रीच्या सीनचं शूटिंग पार पडत होतं तेव्हा संपूर्ण युनिट मॉनिटर स्क्रीनवर त्या सीनचा आनंद घेत होतं. एक आर्टिस्ट म्हणून मला खूप आनंद झाला. परंतु जरी मी कपडे शिवासारखे घातले असले तरी मी आतून सीताईच आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मस्तीसुद्धा सीताईच्या पद्धतींने करायची आहे. अशी संधी आर्टिस्टला मिळणं ही मोठी गोष्ट आहे आणि ही संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List