एकनाथ शिंदे यांना सर्वकाही उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीतूनच मिळाले आहे – संजय राऊत
एकनाथ शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे यांना सर्वकाही उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीतूनच मिळाले आहे असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरांमुळे आम्ही सगळे निर्माण झालो. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे प्रॉडक्शन आहे. आम्ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले लोक आहोत. एकनाथ शिंदें सारख्या लोकांना आयुष्यात जे काही मिळालं आहे, ते उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर मिळालेले आहे. त्यापूर्वी ते फार सक्रिय नव्हते. एकनाथ शिंदे यांना जे काही मिळालं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीतूनच मिळालेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवनात कृतज्ञता हा शब्द नसेल तर कृतघ्नता हा शब्द असणार. तुमचे मतदभेद झाले असतील तुम्ही सोडून गेलात समजू शकतो, आम्ही तुमच्यावर टीका करतो, तुम्ही आमच्यावर टीका करता. पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरेंबाबत वापरता, एकनाथ शिंदे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्याच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा. मी या मताचा आहे की एकनाथ शिंदे यांचे जे सत्तेचे वजन दाखवत आहेत, त्याचे मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे. त्या कचऱ्यातून सर्वाधिक ऊर्जा उद्धव ठाकरेंनी तुम्हाला दिलेली आहे. अशी उर्जा तुम्ही त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्याले लोक आज त्यांच्याच अवती भवती आहेत. हे ठाण्यात आमदार, खासदार आहेत ना हे सगळे उद्धव ठाकरेंना म्हस्के लावायला आले होते. साहेब हे करू नका, हा माणूस तुम्हाला दगा देईल, याची नियत काही चांगली नाही हे सांगणारे लोकच त्यांच्या भोवती आहेत, आम्ही त्याला साक्षीदार आहोत. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावीत, टीका सहन करावी. राज्यकर्त्यांनी टीका सहन केली तर तो दोन पावलं अधिक पुढे जातो. विशेषतः ज्यांनी सुरूवातीच्या काळापासून ज्यांनी भरभरून मेहेरबानी केली आहे, भरभरून दिले आहे, त्यांच्याबाबतीत हे सगळं जपून केलं पाहिजे. त्याबाबतीत छगन भुजबळांनी ते पथ्य पाळलं होतं. गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो, शिवसेना सोडल्यावर गणेश नाईक यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंवर टीका केली नव्हती कारण ते कृतज्ञ होते. या पक्षाने मला भरभरून दिलं असं म्हणून बरेच लोक कृतज्ञता व्यक्त करतात. अनेकांना ठाकरे कुटुंबाने दिलं, त्यांनी दिलं म्हणून तुमची किंमत वाढली नाही तर मोदी शहा तुम्हाला दारात उभं नाही करणार. मला माहित आहे त्यांची नियत काय आहे. शिवसेना फोडण्याची तुमच्यात क्षमता होती म्हणून तुम्हाला त्यांनी जवळ केलं. तुम्ही फार मोठं राष्ट्रीय कार्य केलं म्हणून त्यांनी तुम्हाला आश्रय नाही दिला. पैश्याच्या ताकदीवर तुम्ही शिवसेना फोडू शकला म्हणून तुम्ही आश्रित आहात.
राज्यात महान लोकशाहीवादी सरकार बसलेले आहे. घटनाबाह्य सरकार चालू शकतं, पण घटनेनुसार जे विरोधीपक्षनेते पद आम्ही मागतोय ते देत नाही. विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्याची भिती सरकारला वाटते असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात आयाराम गयारामची संख्या सर्वाधिक आहे ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे. गेल्या तीन वर्षात आयाराम गयारामांचे प्रकार वाढले आहेत. ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणाला दिलेली चपराक आहे. महाराष्ट्राची नासाडी करण्याचे काम मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाने केली, म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ही टिप्पणी करावी लागली असेही संजय राऊत म्हणाले.
एखाद्याला रिक्षावाला म्हणण्यासाठी परदेशातून फंडिंग होत असेल तर कठीण आहे. आम्ही रोज रिक्षावाला, रिक्षावाला म्हणू, आम्हाला कोण फंडिंग करतोय बघू. एखाद्याला रिक्षावाल्यावर गाणं करण्यासाठी परदेशातून फंडिंग होत असेल तर अमेरिकेच्या प्रेसिडेन्टना विचारावं लागेल तुम्ही फंडिंग केलंय का? परदेशातून एखादा चाहता पैसे पाठवू शकतो. तुम्हाला नाही का फंडिंग मिळत? तुमचे परदेश दौरे कशावर चाललेलत? तानाजी सावंत यांचा मुलगा 82 लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला, मग त्याला काय परदेशी फंडिंग म्हणायचं का? एकनाथ शिंदे यांच्या भोवती बिनडोक लोक आहेत म्हणून एकनाथ शिंदेंची ही अवस्था आहे. एकनाथ शिंदे यांची बिनडोक सेना आहे. या बिनडोक सेनेमुळेच शिंदेंचे अधःपतन वाढले आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List