मध्यरात्री सलमान-शाहरुख अचानक पोहोचले आमिर खानच्या घरी; नेमकं काय आहे कारण?
आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान या बॉलिवूड इंडस्ट्रीतील तीन मोठ्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतूर असतात. मात्र चाहत्यांची ही इच्छा फार क्वचित पूर्ण होताना दिसते. आमिर, शाहरुख आणि सलमान सहसा एकत्र येत नाहीत, पण जेव्हा ते येतात.. तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते. असंच काहीसं बुधवारी रात्री पहायला मिळालं. बुधवारी रात्री तिन्ही खान एकत्र दिसले. शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांना आमिरच्या घराबाहेर पाहिलं गेलं. मात्र हे तिघे अचानक असे एकत्र का आले, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सलमान आणि शाहरुख असं मध्यरात्री आमिरच्या घरी का गेले, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
यामागचं कारण म्हणजे आमिर येत्या 14 मार्च रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सलमान आणि शाहरुख त्याच्या घरी पोहोचले होते. या दोघांनी आमिरच्या घरी त्याचा वाढदिवस साजरा केला. कडक सुरक्षेत सलमान आमिरच्या घरी पोहोचला होता. तर शाहरुखने पापाराझींपासून चेहरा लपवत तिथून हळूच काढता पाय घेतला. बर्थडे सेलिब्रेशननंतर आमिर सलमानला गाडीपर्यंत सोडायला बाहेर आला होता. तेव्हा पापाराझींनी त्यांचा व्हिडीओ शूट केला.
तिन्ही खानच्या भेटीचं आणखी एक कारण म्हणजे इफ्तार पार्टी असल्याचंही म्हटलं जातंय. आमिरने त्याच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी शाहरुख आणि सलमान वेळात वेळ काढून तिथे पोहोचल्याचं समजतंय. दरवर्षी राजकीय नेते बाबा सिद्दिकी मोठ्या इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. त्यावेळी सलमान आणि शाहरुख तिथे आवर्जून हजेरी लावतात. याशिवाय बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीसुद्धा या इफ्तार पार्टीला उपस्थित राहायचे. मात्र गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांच्यात फार जुनी मैत्री होती.
आमिरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने काही काळ कामातून ब्रेक घेतला आहे. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी आमिरने हा ब्रेक घेतला आहे. यादरम्यान त्याचा मुलगा जुनैद खानचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी ‘महाराजा’मधील त्याच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. मात्र खुशी कपूरसोबतचा त्याचा ‘लवयापा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List