बिनकामाचे वाद उकरून काढून…; मटणाच्या सर्टिफिकेट्सवरुन अभिनेत्याची पोस्ट
मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हिंदूंमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विरोधकांनी म्हटले. जेजुरी देवस्थान तसंच गावकऱ्यांचा देखील या निर्णयाला विरोध आहे. आता यावर अभिनेता किरण मानेने केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
काय आहे किरण मानेची पोस्ट?
‘मल्हार’… बहुजनांचा कुलस्वामी खंडोबाराया! बहुजनांवर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या घुसखोरांना नेस्तनाबूत करून या भुमीवर बळीचं राज्य आणणारा अत्यंत शूर, पराक्रमी असा पूर्वज. आमच्या काळजात त्याला वेगळं स्थान आहे. ग्रामीण महाराष्ट्रात बहुसंख्य घराघरातल्या देव्हाऱ्यात पुजला जाणारा त्याचा हा फोटो खुप काही सांगून जातो. महाराष्ट्र शासनाला आमच्या या पुर्वजाचं नाव द्यायचंच असेल तर देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या जवानाला किंवा समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या समाजसेवकाला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी वापरावे…’ असे किरण माने म्हणाला.
पुढे तो म्हणाला, ‘छोट्या दुकानांना दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेटसवर हे नाव देऊन त्याचा अपमान करू नये.…आणि हो, आत्ता जनता जगण्याशी संबंधित प्रश्नांनी हैराण आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवर होणारे बलात्कार, रस्त्यात दिवसाढवळ्या पडणारे खुन, स्पर्धा परीक्षा पेपर घोटाळा, भ्रष्टाचारी गुन्हेगार मंत्र्यांची मनमानी… अशा अनेक गोष्टींनी सर्वसामान्य जनता त्रस्त आहे… त्यावर बोलू नये म्हणून असे बिनकामाचे वाद उकरून काढून आम्हाला उल्लू बनवण्याचे हे ‘स्पॉन्सर्ड’ कार्यक्रम बंद करा. जय मल्हार !’
सध्या सोशल मीडियावर किरण मानेची ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेकजण या पोस्टवर कमेंट करत हे बरोबर आहे असे बोलताना दिसत आहेत.
काय आहे मल्हार प्रमाणपत्र वाद?
मस्त्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील हिंदू झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’ नावाचं पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली. इतकंच नाही तर हे मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मांस विकत घेण्याचं आवाहन त्यांनी केल्यानं वाद निर्माण झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List