लष्करी गणवेश, हेल्मेटमध्ये कॅमेरा अन्… रशिया-युक्रेन युद्धाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराचा भूसुरूंग स्फोटात मृत्यू
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराचा भूसुरूंग स्फोटामध्ये मृत्यू झाला आहे. रशियाच्या बेल्गोरोड भागात युक्रेनच्या सैन्याने हे भूसुरूंग पेरुन ठेवले होते आणि त्यावर पाय पडल्याने या भूसुरूंगाचा स्फोट झाला. यात रशियाची महिला पत्रकार अॅना प्रोकेफिएव्हा (वय – 35) हिचा मृत्यू झाला तर तिचा कॅमेरामन दिमित्री वोल्कोव्ह या गंभीर जखमी झाला आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.
रशियाच्या दक्षिण बेल्गोरोड प्रदेशामध्ये युक्रेनकडून वारंवार ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू आहे. याच भागामध्ये युद्धाचे वार्तांकन करण्यासाठी सरकारी टीव्हीची महिला पत्रकार अॅना प्रोकेफिएव्हा गेली होती. मात्र युक्रेनने पेरलेल्या भूसुरूंगावर पाय पडल्याने मोठा स्फोट झाला आणि यात अॅना प्रोकेफिएव्हा हिचा मृत्यू झाला, तर तिचा कॅमेरामन दिमित्री वोल्कोव्ह गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयातमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातीला युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन रशियन पत्रकार आणि त्यांच्या ड्रायव्हरसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. रशियाचे नियंत्रण असलेल्या पूर्व युक्रेनच्या लुहान्स्क प्रदेशात ते तैनात होते. धक्कादायक म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 हून अधिक माध्यमकर्मी मारले गेले आहेत, अशी माहिती ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट’ने दिली आहे.
कोण होती अॅना प्रोकेफिएव्हा?
मॉस्को टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅना प्रोकेफिएव्हा ही 2023 पासून ‘चॅनल वन’साठी युद्धाचे वार्तांकन करत होती. मंगळवारी तिने टेलिग्रामवर शेवटची पोस्ट पाठवली होती. यात ती लष्करी पोशाखात दिसत असून तिच्या डोक्यावरील हेल्मेटमध्ये कॅमेरा लावण्यात आलेला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List