‘माझ्या तोंडाला काळं फासलं, पाया पडून माफी मागायला लावली’; हंसल मेहता यांचा कुणाल कामराला पाठिंबा
कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गीतामुळे राज्यात नवा वाद उद्भवला आहे. या गीतेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. या वादादरम्यान काहींनी कुणालचा विरोध केला तर काहींनी त्याची बाजूसुद्धा घेतली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा कुणाल कामराला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्वत:चाही एक अनुभव सांगितला. 25 वर्षांपूर्वी ‘दिल पे मत ले यार’ या डार्क कॉमेडीमुळे हंसल मेहता यांना परिणाम भोगावे लागले होते.
हंसल मेहता यांची पोस्ट
ट्विटरवर मेहता यांनी लिहिलं, ‘कामरासोबत जे घडलं, ते दुर्दैवाने महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. मला स्वत:ला असा अनुभव आला होता. 25 वर्षांपूर्वी त्याच (तेव्हाच्या अविभाजित) राजकीय पक्षाच्या निष्ठावंतांनी माझ्या कार्यालयात घुसून हल्ला केला. तिथे त्यांनी तोडफोड केली, माझ्यावर हल्ला केला, माझ्या चेहऱ्याला काळं फासलं आणि माझ्या चित्रपटातील एका डायलॉगसाठी त्यांनी मला एका वृद्ध महिलेच्या पाया पडून जाहीरपणे माफी मागण्यास लावलं होतं. तो डायलॉग निरुपद्रवी होता किंवा क्षुल्लक होता असं म्हटल्यास हरकत नाही. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 27 कटसह आधीच मंजुरी दिली होती. पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही. जिथे मला माफी मागायला लावलं, तिथे किमान 20 राजकीय व्यक्ती पूर्ण ताकदीने पोहोचले होते. त्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन केवळ सार्वजनिक लाजिरवाणी परिस्थिती म्हणून केलं जाऊ शकतं, कारण तिथे 10 हजार प्रेक्षक आणि मुंबई पोलीस फक्त शांतपणे सगळं पाहत उभे होते.’
What happened with Kamra is, sadly, not new to Maharashtra. I’ve lived through it myself.
Twenty-five years ago, loyalists of the same (then undivided) political party stormed into my office. They vandalised it, physically assaulted me, blackened my face, and forced me to…
— Hansal Mehta (@mehtahansal) March 24, 2025
‘त्या घटनेनं फक्त माझ्या शरीरावरच जखमा झाल्या नाहीत तर माझ्या मनावरही अनेक जखमा झाल्या. त्याने माझी चित्रपट निर्मिती मंदावली, माझं धैर्य कमी झालं आणि माझ्या मनाच्या कोपऱ्यातील असे काही भाग सुन्न झाले, ते पुनर्जिवित करण्यासाठी अनेक वर्षे लागली. मतभेद कितीही खोल असले, कितीही तीक्ष्ण असले तरी हिंसाचार, धमकी आणि अपमान कधीही न्याय्य ठरू शकत नाही. आपण स्वत:चे आणि एकमेकांचे ऋणी असलं पाहिजे. आपण संवाद, मतभेद आणि प्रतिष्ठेचे ऋणी असलं पाहिजे’, असं त्यांनी पुढे लिहिलं.
हंसल मेहता यांचा 2000 मध्ये प्रदर्शित झालेला तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटावर प्रेक्षक आणि समिक्षकांकडून जोरदार टीका झाली होती. त्या घटनेनंतर मेहता दिवाळीखोरीत निघाले आणि हळूहळू दारुच्या व्यसनाधीन झाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List