याचा रोल किती बोलतो किती? म्हणणाऱ्यांना संतोष जुवेकरने दिलं उत्तर; सांगितलं अक्षय खन्नाशी न बोलण्यामागचं खरं कारण
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात रायाजींची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. चित्रपटाच्या सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं संतोष म्हणाला होता. त्यावर त्याला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर संतोषने आपली बाजू मांडली आहे. “अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये. लोक म्हणतील की आता सारवासारव करायला आला. पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात किंवा मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं”, असं जुवेकर म्हणाला.
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “अक्षय खन्ना हा मुलाखती देत नाही, सोशल मीडियावर सक्रिय नाही, तो प्रमोशनलादेखील उपस्थित राहत नाही.. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मग मी पण हे सर्व करायचं नाही का? किंवा मी जे करतो तो त्यानं करायचं का? तो मोठा अभिनेता आहे, त्याला या सर्वांची गरज नाही. आम्ही स्ट्रगलर्स आहोत. आम्हाला या सर्वाची गरज आहे. लोक म्हणाले की याचा रोल किती हा बोलतो किती? अरे मी बोलणार. मी नुसता स्क्रीनवरून डोकावून गेलो तरी मी बोलणार. कारण या चित्रपटाचा एक भाग असणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अशा संधी प्रत्येकाला मिळत नाही. ज्यांना मिळालं त्यापैकी मी एक आहे.”
“पुस्तक वाचल्यानंततर मला जो इतिहास कळला, त्यामुळे माझ्या मनात थोडासा राग आहेच. कोणाला राग येणार नाही? मला ट्रोल करणाऱ्यांपैकी एक जरी व्यक्ती तिथे असती तर त्यानेही तेच केलं असतं याची मला खात्री आहे. पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे, असा होत नाही. सेटवर आमच्या एका सहाय्यकाने मला विचारलं होतं की अक्षय खन्नाला भेटायचं आहे का? मी भेटायला गेलोसुद्धा होतो. पण त्याला औरंगजेबाच्या गेटअपमध्ये पाहून मी भेटण्यास नकार दिला. कारण मला ते बघवत नव्हतं”, असं संतोष जुवेकरने स्पष्ट केलं.
संतोष जुवेकर काय म्हणाला होता?
‘छावा’ या चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव सांगताना संतोष जुवेकर एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत, त्या कोणाशीच मी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. त्यांच्या बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण मी त्याच्याकडे बघितलंच नाही. माझा त्याच्यावर काही वैयक्तिक राग नाही. पण मला त्याच्याशी बोलावंसं वाटलं नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List