लग्नाच्या 4 महिन्यांतच पतीकडून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप; अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
‘रब से है दुआ’, ‘ये जादू है जिन का’ आणि ‘अपोलेना’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती शर्मा सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड अभिनीत कौशिकशी लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नापूर्वी अदिती आणि अभिनीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र लग्नानंतर अभिनीतने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. आता पतीच्या या आरोपांवर पहिल्यांदाच अदितीने मौन सोडलं आहे. ‘अपोलेना’ या मालिकेतील सहअभिनेता समर्थ्य गुप्तासोबत अदितीचं अफेअर असल्याचा दावा अभिनीतने केला. त्याचप्रमाणे कामावर परिणाम होऊ नये म्हणून गुपचूप लग्न करण्याची अट ठेवल्याचंही त्याने म्हटलं होतं. या सर्व आरोपांवर आता अदितीने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनीतसोबतचं प्रकरण सध्या कोर्टात सुरू असल्याने अदिती यावर फार काही बोलू शकली नाही. मात्र तिने कधीच अभिनीतवर हात उचलला नसल्याचं स्पष्ट केलं. “मी कोणत्याही सहअभिनेत्यासोबत किंवा पुरुषासोबत बोलले तरी त्याला ते पटायचं नाही. त्याला खूप असुरक्षित वाटायचं”, असं ती म्हणाली. यावेळी तिने गुपचूप लग्नाच्या अटीबद्दलही स्पष्टीकरण दिलं. ती पुढे म्हणाली, “आमचं लग्न हा एक खासगी कार्यक्रम होता. पण त्यात सिक्रेट असं काहीच नव्हतं. माझे कुटुंबीय, माझे जवळचे मित्रमैत्रिणी, माझे पाहुणे या सर्वांना लग्नाबद्दल माहीत होतं. त्यामुळे सिक्रेट लग्न नव्हतं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आम्ही लग्नगाठ बांधली. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि मला त्याला गमवायचं नव्हतं, म्हणून आम्ही लग्न केलं.”
‘अपोलेना’ या मालिकेत अदिती 18 वर्षीय मुलीची भूमिका साकारतेय. त्यामुळे लग्नाच्या बातमीचा तिच्या ऑनस्क्रीन इमेजवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून अभिनीतशी चर्चा करूनच खासगीत लग्न केल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र आता चार महिन्यांतच घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याविषयी विचारलं असता तिने सांगितलं, “एक नाही तर अनेक कारणं आहेत. त्याबद्दल मी कोर्टात सविस्तर बोलेनच. अभिनीतने माझ्या आईवडिलांचा अनेकदा अपमान केला. मी त्याची गैरवर्तणूक सहन करत आले. काही कारणांमुळे मला माझं घर सोडावं लागलं आणि मी खूप घाबरले होते. अंडरवर्ल्डमधील काही नावं आहेत ज्यात तो आणि त्याचा जवळचा मित्र सामील आहे.”
“समर्थ्य आणि मी खूप चांगले मित्र आहोत. खरं सांगायचं झाल्यास मी कोणत्याही पुरुषाकडे पाहिलं किंवा बोलले किंवा पार्टीमध्ये चार लोकांशी गप्पा मारल्या, तरी त्याला समस्या असायची. सोशल मीडियावर मी हृदयाचा इमोजी पोस्ट केला तरी त्यावरून तो मोठा वाद निर्माण करायचा. या कारणांमुळे मी हळूहळू माझ्या मित्रमैत्रिणींकडून आणि कुटुंबीयांकडून दुरावत गेले”, असं म्हणत अदितीने तिची बाजू मांडली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List