शिवद्रोही कोरटकरला तेलंगणातून उचलले
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला आज पोलिसांनी तेलंगणातून उचलले. महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.
कोरटकरला अटक झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठाला दिली. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी कोरटकरने केलेली याचिका अॅड. सौरभ घाग यांनी मागे घेतली.
इंद्रजित सांवतांना दिलेली धमकी भोवली
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर कोरटकरने सावंतांना फोन करुन धमकी दिली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केली. इंद्रजित सावंतांनी हे संभाषण सोशल मीडियावर टाकले. याने राज्यभरात संतापाची लाट उठली. कोल्हापूर येथे याचा गुन्हा दाखल झाला.
दुबईतील फोटोने बवाल
24 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सावंतांना फोन केल्यापासून कोरटकर फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी नागपूरसह विदर्भ पिंजून काढला. पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता. त्याचदरम्यान कोरटकरचा दुबईतील फोटो सोशल मीडियावर झळकला. याने तो दुबईत पळून गेल्याचा दावा झाला. इंद्रजित सावंतांनी त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली. त्यानंतर कोरटकरच्या पत्नीने त्याचा फोटो पोलिसांत जमा केला. परिणामी कोरटकर दुबईत पळाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
न्यायालयाची चपराक
अटकपूर्व जामीनासाठी आधी कोरटकरने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले. नंतर हा दिलासा वाढवून देण्याची कोरटकरची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. सविस्तर सुनावणी घेऊन न्यायालयाने कोरटकरला अटकपूर्व जामीन नाकारला. त्याने तातडीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. उच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. पुढे सुनावणी आधीच कोरटकरला अटक झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List