‘मिल्की ब्युटी’ म्हणणाऱ्या पत्रकारावर भडकली तमन्ना भाटिया; म्हणाली “महिलांचा आदर..”
अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. लवकरच ती ‘ओडेला 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तमन्ना एका पत्रकारावर वैतागलेली दिसून आली. कारण एका पत्रकाराने तिला ‘मिल्की ब्युटी’ असं म्हणत तिला चित्रपटात घेण्याविषयी दिग्दर्शकाला सवाल केला होता. यावरूनच तमन्नाचा पारा चढला. या पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने दिग्दर्शक अशोक तेजा यांना विचारलं, “शिव शक्तीच्या भूमिकेसाठी तुम्ही मिल्की ब्युटीची निवड का केली?” हा प्रश्नच तमन्नाला आवडला नाही आणि दिग्दर्शकाऐवजी तिनेच आधी उत्तर दिलं.
“तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. ते मिल्की ब्युटीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहत नाहीत. एखाद्या स्त्रीमध्ये ग्लॅमर असणं ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आपण महिलांनी स्वत:चंच कौतुक करायला हवं. तरंच आपण इतरांकडून आपला आदर आणि कौतुक होण्याची अपेक्षा करू शकतो. जर आपणच स्वत:चा आदर केला नाही तर दुसरं कोणीही ते आपल्यासाठी करणार नाही”, असं रोखठोक उत्तर तमन्नाने दिलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “इथे आपल्याकडे एक अद्भुत गृहस्थ आहेत, जे स्त्रियांकडे अशा नजरेने पाहत नाहीत. ते स्त्रियांकडे दैवी दृष्टीकोनातून पाहतात. स्त्रियांमधली ही दैवी शक्ती कधी मोहक, कधी प्राणघातक तर कधी शक्तीशाली असू शकते. एक स्त्री अनेक गोष्टी असू शकते.”
चित्रपटांसोबतच तमन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून ती अभिनेता विजय वर्माला डेट करत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर अद्याप दोघांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान या दोघांना गोव्यात एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. त्यानंतर अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये, डिनर डेटला या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List