हे सभागृह प्रशांत बंबच्या बापाचे नाही! अभिजीत वंजारी संतापले
विधानसभेत संविधानावरील चर्चेत आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांची पदे रद्द केली पाहिजेत आणि विधान परिषदही बरखास्त केली पाहिजे, असे विधान सोमवारी केले होते. त्यावर संतापलेल्या काँग्रेस सदस्य अभिजीत वंजारी यांनी संविधान प्रशांत बंब यांच्या बापाचे नाही, हे सभागृह प्रशांत बंब यांच्या बापाचे नाही, असा संताप व्यक्त करून बंब यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली.
विधान परिषदेत संविधानावर चर्चा सुरू असताना अभिजीत वंजारी यांनी उभे राहत विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, कोणाच्या मेहरबानीने या सभागृहाचे सदस्य निवडून आलेले नाहीत. कोण आहे हा प्रशांत बंब, असा सवाल करत वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आगपाखड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली. बंबने माफी मागावी नाही तर ही चर्चा आम्ही चालू देणार नाही. सरकारने त्याला समज दिली पाहिजे, वेसण घातले पाहिजे, त्याने या सभागृहाची माफी मागितली पाहिजे, असे वंजारी म्हणाले. संतापलेल्या इतर सदस्यांनीही बंब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत गदारोळ केला. दरम्यान, बंब यांनी असे वक्तव्य केले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही बाब आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List