कमळाबाई वाटणार शेवई, खजूर आणि ड्रायफ्रूट; माशा अल्लाह…ईदनिमित्त मोदीजानची सौगात
‘हिंदू खतरे में…’ अशी आरोळी ठोकणाऱ्या ‘मोदीजान’ची ईदनिमित्त मात्र मुस्लीम बांधवांवर सौगात झाली असून ‘मुसलमानांशी प्यार ही प्यार’ उफाळून आले आहे. या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ईदनिमित्त मुस्लिमांना शेवई, खजूर आणि ड्रायफ्रूट वाटले जात आहेत. भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडून आयोजित ‘सौगात ए मोदी’ अभियानात 32 लाख मुस्लिमांना ‘गिफ्ट किट’चे वाटप केले जात आहे. भाजपच्या या बदलत्या भूमिकेमुळे ‘माशा अल्लाह…’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मुस्लीम बांधवांचा नेहमीच तिरस्कार करणाऱ्या भाजपकडून ईदमध्ये त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी आणि मुस्लीम बांधवांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी रमजानच्या पवित्र महिन्यात ‘सौगात ए मोदी’ हे अभियान भाजपकडून सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या निजामुद्दीन येथून या अभियानाची आज सुरुवात झाली. ईद साजरी करण्यास गरीब कुटुंबातील मुस्लीम समाजाला कुठलीही अडचण होऊ नये यासाठी गरीब, गरजूंना गिफ्ट किटचे वाटप करण्यात येत असल्याचे यावेळी भाजपकडून सांगण्यात आले.
जिल्हास्तरावर ईद मिलनाचा कार्यक्रम
सौगात ए मोदी अभियानात जिल्हास्तरावर ईद मिलनाचे कार्यक्रम केले जातील तसेच मुस्लीम समुदायासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे यावर भर दिला जाणार आहे.
तीन हजार मशिदींमध्ये वाटप
भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडून मुस्लिमांना वाटण्यात येणाऱ्या गिफ्ट किटसाठी 32 हजार पदाधिकारी देशातील 3 हजार मशिदींमध्ये जाणार आहेत. यामध्ये सुमारे 32 लाख गरजू मुस्लीम व्यक्तींना ईद साजरी करण्यासाठी किट वाटले जाणार आहेत. गुड फ्रायडे, ईस्टर, भारतीय नववर्षात सहभाग घेत ‘सौगात ए मोदी किट’ वितरीत करण्यात येईल. त्यामुळे सांप्रदायिक सलोखा वाढवण्यास मदत होईल असा दावा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी केला आहे.
‘सौगात ए मोदी’ किटमध्ये काय काय आहे?
भाजपच्या ‘सौगात ए मोदी’ अभियानाच्या किटमध्ये कपडे, शेवई, खजूर, ड्रायफ्रूटस आणि साखर असेल. महिलांसाठी सूटचे कपडे असतील. पुरुषांसाठी कुर्ता, पायजमा असणार आहे. या प्रत्येक किटची किंमत 500 ते 600 रुपये इतकी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List