“हे कुठे थांबणार? बाळासाहेब ठाकरे मुंबईबद्दल बोलायचे…” शरद पोंक्षेंना नक्की कसली भीती?
मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायमच आपले मत स्पष्टपणे मांडत आले आहेत. मग ते राजकारण असो, समाजकारण असो किंवा मग चित्रपट असो. ते कायमच त्यांच्या मनातील विचार मांडतात. त्यांचे व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात.सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एक भीती व्यक्त केली आहे.
शरद पोंक्षेंकडून मुंबईबद्दल चिंता व्यक्त
शरद पोंक्षे यांनी देशासह मुंबई , पुण्यात होणाऱ्या लोकांच्या गर्दीबद्दल या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. शहरांमध्ये येणारे लोंढे आता थांबवण्याची गरज आहे, नाहीतर मुंबई कधीतरी फुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या पिढीने शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या बांधकामाचा सर्वाधिक त्रास सहन केला, असंही ते म्हणाले.
बाळासाहेबांची आठवण काढत म्हणाले….
व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “गेली 50 वर्षे मी मुंबईमध्ये राहतो. या 50 वर्षांमध्ये बदलत गेलेली मुंबई मला बघायला मिळाली. आमच्या पिढीने सर्वात जास्त त्रास सहन केला. म्हणजे विकासासाठी मुंबईची जी काम काढली जातात, रस्ते, पूल वगैरे वगैरे. आमचं सगळं आयुष्यच काहीतरी बांधकाम सुरू असताना पाहण्यात गेलं, त्यामुळे ट्रॅफिक आणि या सगळ्यांमध्ये आमचं आयुष्य गेलं. त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. शहरांचा, देशाचा जर विकास व्हायला हवा असेल तर मग त्रास सहन करायला पाहिजे. पण हे सगळं होत असताना मला हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आठवतं. मला त्यांची भाषणे भयंकर आवडायची मी त्यांचा फॉलो करतो मी त्यांच्या सगळ्या शिवाजी पार्कच्या भाषणाला जायचो. 1994-95 च्या काळातील एका भाषणामध्ये ते असं म्हणाले होते की मुंबईमध्ये येणारे लोंढे आता थांबवायला पाहिजे. 94-95 नंतर येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये आता घेऊ नका, कारण एक दिवस ही मुंबई फुटेल.”असं म्हणत त्यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येबद्दल भाष्य केलं तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण कढली.
“हे कुठे थांबणार आहे?”
पुढे ते म्हणाले, “आता मुंबईला वाढायला जागा राहिलेली नाही, कारण चारही बाजूंनी समुद्र आहे. मुळात ब्रिटिशांनी सात बेटं एकमेकांमध्ये भरती करून त्याला मुंबई नावाचं शहर बनवलं गेलं आणि नंतर मग बांद्रापर्यंत ते वाढलं आणि आता उपनगरं वाढत वाढत ते पार पालघरपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. आणि दुसरीकडे डोंबिवली आणि बदलापूर इथपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. मला डोक्यामध्ये विचार येतात की सगळ्या बेटांच्या मध्ये भराव घालून ही मुंबई मोठी केलेली आहे आणि आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जे टॉवर्स उभे राहतात ते टॉवर्स बघून भयानक भीती वाटते. खरच सांगतो हे कुठे थांबणार आहे?” असं म्हणत त्यांनी ही गर्दी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे पण त्यावर उपाय काय? असा प्रश्न त्यांनी मांडला आहे.
“एकाही राजकीय नेत्याला किंवा राजकीय पक्षाला….”
शरद पोंक्षे पुढे म्हणाले “एकाही राजकीय नेत्याला किंवा राजकीय पक्षाला असं कधी वाटत नाही का की फक्त विकासाची काम करणं हा एकमेव उपाय नाहीये. सगळ्यात मोठा उपाय आहे तो या शहरांमध्ये येणारे लोंढे थांबवणं. शेवटी प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची, प्रत्येक देशाची संसाधन पुरवण्याची क्षमता असते. समाज लोक एकत्र राहतात त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि सगळ्यात सोयी सुविधा म्हणजे वीज, चांगली घर, चांगले रस्ते चांगले फुटपाथ सगळ्या प्रकारच्या सुख सोयी चांगले मार्केट, चांगलं भाजी मार्केट चांगले मॉल्स असे सगळ्या गोष्टी असतात. हे शहर शेवटी फुटणार आहे, हे खरंच कधीच थांबणार आहे?” शरद पोंक्षेंनी सरकारलाही हा सवाल करत मुंबईत, पुण्यात बाहेरून येणारे लोंढे थांबवा अशी विनंती केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List