World Puppet Day- येत्या काळात AI च्या मदतीने तयार केलेले बाहुले दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका- सत्यजीत पाध्ये
>>> प्रभा कुडके
शब्दभ्रमकार सत्यजीत पाध्ये यांची ओळख करुन देण्याची गरज नाही. शब्दभ्रमकार रामदार पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांचे सर्वात मोठे चिंरजीव. सत्यजीतने आई वडिलांचा कित्ता गिरवत शब्दभ्रमकार या क्षेत्रात अल्पावधीत ठसा उमटवला. देशा परदेशात सत्यजीतचं नाव सध्याच्या घडीला खूप गाजत आहे. नुकताच त्याने कोल्ड प्ले मध्ये देखील त्याची कला सादर केली होती. आजच्या जागतिक पपेट दिवसाच्या निमित्ताने त्याने सामना आॅनलाइन सोबत खास संवाद साधला.
सत्यजीत तू स्वतः सीए असताना, या बाहुल्यांच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय कसा घेतलास?
घरातूनच मला या क्षेत्राचं बाळकडू मिळालं होतं. त्यामुळे माझ्यासाठी हे क्षेत्र नवीन नव्हतं. मी सात वर्षांचा असल्यापासून, बाबांसोबत त्यांच्या कार्यक्रमांना जायचो. त्यामुळे बाबांनी मी खूप लहानपणापासून कला सादर करतांना बघत आलोय. ते कसा कार्यक्रम करतात हे सर्व मी पाहिलं होतं. तेंव्हापासून मला या क्षेत्राची गोडी लागली होती. सातवीत असताना, मला स्टेजवर बोलक्या बाहुल्या सादर करण्याची सर्वात पहिली संधी मिळाली होती. त्यावेळी मी पिंक पॅंथर हे पपेट डिझाइन केलं होतं. हे पपेट डिझाइन करुन स्क्रिप्ट सुद्धा मीच लिहिलं होतं. बोलक्या बाहुल्याची कला सादर करण्याचा माझा तो माझा पहिला अनुभव होता. मी शिक्षण सीएचे घेतले असले तरी, मला या क्षेत्राची आणि कामाची गोडी लागत गेली. म्हणूनच मी या बाहुल्यांच्या संगतीत काम करण्याचा निर्णय घेतला.
तुमच्या घरातील अर्धवटराव आणि आवडाबाई यांच्याबद्दल काय सांगशील?
अर्धवटराव सध्या 105 वर्षांचा झालेला आहे. तर आवडाबाई 80 वर्षांची आहे. अर्धवटराव हा कुणी बाहुला नसून, आमच्याच घरातील एक व्यक्ती आहे. त्यामुळेच आमच्या घरी सर्व बाहुल्यांसाठी स्वतंत्र खोली ठेवण्यात आली आहे. सध्याच्या घडीला आमच्याकडे जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त बाहुले आहेत.
तू कोणती पपेट स्वतः डिझाइन केली आहेस?
मी कार्यक्रम करतो ती सर्व पपेट मीच डिझाईन केली आहेत. यामध्ये छोटू सिंग, बंड्या, अस्लम अशा विविध बाहुल्या मी डिझाइन केल्या आहेत.
तुम्ही पपेट शो सादर करता त्याचबरोबरीने तुम्ही पपेट डिझाइनिंगमध्ये पण कार्यरत आहात त्याबद्दल काही सांगशील का?
गेली 25 वर्षे आम्ही कुटूंबिय पपेट डिझाइनिंगमध्ये काम करत आहोत. मराठी चित्रपटातील ख्यातनाम ‘तात्या विंचू’ हा बाहुला आम्हीच डिझाइन केला होता. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुद्धा पपेट डिझाइनिंगचे काम आम्ही वेळोवेळी केलेले आहे.
आत्तापर्यंत तू जगभरात पपेट शो केलेस? यातला तुला आलेला सर्वात अविस्मरणीय अनुभव कोणता?
मी चायना आणि रशिया मध्ये शो केला होता. तिथल्या प्रेक्षकांनी माझ्या शोला स्टॅंडिंग ओव्हिएशन दिले होते. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. अविस्मरणीय अशासाठी कारण चायना आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये ही कला अगदीच नवीन आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेली कौतुकाची पोचपावती खूपच महत्त्वाची होती.
आगामी काळात या क्षेत्रापुढे कोणती आव्हानं असतील असं तुला वाटतं?
शब्दभ्रम ही कला स्टॅंडअप काॅमेडीचा एक भाग आहे. त्यामुळे या कलेचे भवितव्य हे नक्कीच उज्जवल असणार यात दुमत नाही. परंतु तंत्रज्ञानाच्या साक्षीनेच आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार हेही तितकेच खरे आहे.
AI आल्यामुळे तुमच्या क्षेत्रावर काही परिणाम झाला आहे का?
झालाय पण अगदी थोडा फार झाला आहे! कारण आमची कला ही सादरीकरणाची आहे. त्यामुळेच आमच्या कलेवर प्रत्यक्ष असा फरक पडलेला नाही. सध्याच्या घडीला मी सुद्धा AI च्या मदतीने पपेट बनवण्याच्या कामात मग्न आहे. त्यामुळे येत्या काही काळात तुम्हाला AI च्या मदतीने पपेट शो सुद्धा पाहायला मिळेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List