हिंमत असेल तर संजय राठोड, जयकुमार गोरे, सोमय्याबद्दल तोंड उघडा, शिवसेनेचा सरकारवर हल्ला… सभागृह तीनदा ठप्प
गेल्या पाच वर्षांपासून दिशा सालियन केस न्यायालयात सुरू आहे. ही केस आजही न्यायप्रविष्ट आहे. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहात कसे मांडता? हिंमत असेल तर संजय राठोड, जयकुमार गोरे, सोमय्याबद्दल तोंड उघडा, असा घणाघाती हल्ला शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी आज विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांवर चढवला. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेच नियमित कामकाज सुरू असताना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून दिशा सालियन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची माहिती सभागृहात दिली. त्यावर भाजपच्या प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, उमा खापरे या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारने नव्याने सीबीआय चौकशी करावी तसेच एसआयटी चौकशीचा निष्कर्ष जाहीर करावा, अशी मागणी केली. तेव्हा शिवसेना आमदार अनिल परब यांनी याच मुद्दय़ावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. जी घटना कोणाला माहीत नाही ती घटना सभागृहाला माहीत व्हावी, सभागृहाला सावध करण्यासाठी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशन (माहितीचा मुद्दा) मांडला जातो. मग ही केस न्यायप्रविष्ठ असताना आणि ती सर्वांना माहीत असताना माहितीच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहात कशी मांडता, ती मांडण्याचा उद्देश काय, असा सवाल त्यांनी सभापतींना केला. न्यायालयात जी याचिका दाखल झाल्याचे सांगितले जात आहे ती कॉपी पेस्ट पिटीशन आहे. हे कोण करतंय, हे न कळण्याइतके आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? असे घणाघाती सवाल करत अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर
हल्ला चढवला.
सोमय्या यांची बायको आत्महत्या करायला गेली होती
किरीट सोमय्या यांचा अर्धनग्न व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांची बायको आत्महत्या करायला गेली होती. किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओची चौकशी का केली गेली नाही? असा सवाल परब यांनी केला.
एसआयटीचा रिपोर्ट गेल्या दीड वर्षात का मांडला गेला नाही?
दिशा सालियन प्रकरणी सीबीआय, सीआयडी, एसआयटी चौकशी झाली. एसआयटीचा रिपोर्ट सभागृहात गेल्या दीड वर्षात का मांडला गेला नाही? ज्यांनी हा एसआयटी रिपोर्ट सभागृहात मांडला नाही त्यांच्यावर कारवाई करा. हा प्रकार म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे. मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्याबाबत तोंड उघडा. जयकुमार गोरे यांचे एवढे उघडेनागडे पह्टो सभागृहात आले. त्याबाबतीत कोण काहीच बोलत नाही. जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्या, असे आव्हान अनिल परब यांनी दिले.
मनीषा कायंदेंचा दुटप्पीपणा उघड
दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीत आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देण्यात आली. ही क्लीन चिट देण्यात आल्यानंतर मनीषा कायंदे यांनीच ट्विट करत आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. ते ट्विट अनिल परब यांनी वाचून दाखवले आणि कायंदे यांचा या प्रकरणातला दुटप्पीपणा सभागृहासमोर उघड केला.
…तर मी बाहेर जाऊन बसतो! विरोधी पक्षनेत्यांचा संताप
कामकाजाचा दिवसभराचा क्रम ठरलेला असताना पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनवर बोलताना चार-चार जणांना बोलायची संधी कशीकाय देता? राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटी नेमली आहे. पाहिजे तेवढी चौकशी करा, पण प्रत्येकाने राजकीय मुद्दा बनवून चार-चार जणांनी बोलायचे हे काही बरोबर नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी दानवे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्याचे बोलणे सुरू असताना मधे मधे बोलणे आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणे बरोबर नाही. तुमची ऐकायची तयारीच नाही. सगळे तुमचेच खरे आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हीच सभागृह चालवा, मी बाहेर जाऊन बसतो, असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List