पोलीस डायरी – पोलिसांनो, गुलाम नको, ‘सिंघम’ व्हा!
>> प्रभाकर पवार
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या चिंचवड येथील केंदूर घाटात दरोडेखोरांनी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार व चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जन्हाड या अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याही अवस्थेत या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दरोडेखोरांना पकडले कर्तव्य बजावताना असे जीवघेणे प्रसंग पोलिसांच्या वाट्याला येत असतात, परंतु गेल्या दशकभरात पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण बेसुमारपणे वाढू लागले आहे. 80-90 च्या दशकात संघटित गुंड टोळ्यांनी मुंबईवर कब्जा मिळविला होता. मात्र पोलिसांवर हल्ला करण्याचे, हात उचलण्याचे धाडस त्यांनी कधी केले नव्हते. आता कुणीही सोम्यागोम्या पोलिसांवर हात उचलताना, त्यांना अपमानित करताना आपणास दिसत आहे. महाराष्ट्रात पोलिसांवर रोज म्हणजे वर्षाचे 365 दिवस हल्ले होत आहेत. दारुड्या महिला तर पोलिसांची थेट कॉलर पकडताना, त्यांच्या थोबाडीत मारताना व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेकदा दिसतात तेव्हा फार वाईट वाटते. महिलांशी किंवा कोणत्याही जनमानसाशी वागताना पोलिसांना “पोलीस हा शिस्तप्रिय Disciplinary force” असल्याने मर्यादा पाळाव्या लागतात. त्याचाच फायदा आज गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत. त्यात अनेक निरपराध पोलिसांचे बळी जात आहेत. रस्त्यावर ड्युटीवर बंदोबस्तासाठी असताना कधी कोण हल्ला करील याचा नेम नाही. कामाचा ताण तर पोलिसांना नेहमीच असतो. याचा धसका सर्वांनाच सहन होत नाही. ड्युटीवर असताना मुंबई पोलीस दलातील दर दोन-तीन दिवसांनी एका तरी पोलिसाला जणांचे प्राण जातात वर्षभरात मुंबई पोलीस दलातील 300 च्यावर पोलिसांचे विविध कारणांनी मृत्यू होतात. त्यात नैसर्गिक बळींची संख्याही कमी नाही पोलिसांवर गाड्या घालायच्या, त्यांना गंभीर जखमी करायचे प्रकारही वाढत आहेत याकडे राज्यकर्त्यांचे अजिबात लक्ष नाही वरिष्ठ अधिकारी स्वतःच्या खुर्च्छा सांभाळण्यातच व्यस्त असतात. पोलिसांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत. सकाळी 8 वाजता ड्युटीवर हजर झालेला पोलीस रात्री घरी वेळेत पोहोचेल याची खात्री नाही. खार येथे विलास शिंदे या वाहतूक पोलीस हवालदाराने गाडीचे पेपर विचारले म्हणून दोन भावांनी त्यांना लाठ्याकाठ्यांनी ठार मारले. त्यामुळे ड्युटीवर गेलेला आपला बाप, पती रात्री घरी येईल की नाही या चिंतेत सारा परिवार असतो.
आज जनतेचे रक्षक पोलीसच असुरक्षित झाले आहेत. मुंबई, ठाणे या भागांत पूर्वी पोलिसांवरील नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूरसारख्या शहरी व ग्रामीण भागांत पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्रात पोलिसांवरील हल्ल्यांच्या 2 हजार 410 घटना घडल्या. त्यात काही पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा प्रश्न पडतो, पोलीसच असुरक्षित असतील तर ते जनतेचे रक्षण काय करणार? एकेकाळी पोलिसांचा गुन्हेगारांमध्ये प्रचंड दरारा होता. खाकी वर्दीची दहशत होती, परंतु पोलिसांची अवस्था आता पोस्टमनसारखी झाली आहे. गणवेश घालण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. असे झाले तर उद्या समाजात अराजक माजेल एवढे लक्षात ठेवा. पोलिसांवरील हल्ले का वाढत आहेत, त्यांना जनमानसांकडून सापत्न वागणूक का दिली जात आहे याचे आता सर्वांनी चिंतन करायची गरज आहे. गेल्या काही वर्षांत पोलीस खात्यात आहे. सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांना नोकरासारखे वापरले जात आहे. त्यांच्याकडून हवी तशी बरी-वाईट कामे करून घेतली जात आहेत. पोलीस ठाण्यात सामान्यांना न्याय मिळत नाही. सत्ताधाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात व त्याप्रमाणे कारवाई केली जाते हे जनतेला आता कळू लागल्याने ते आपला राग भररस्त्यात पोलिसांवर, विशेषतः वाहतूक पोलिसांवर काढत आहेत त्यांना शिवीगाळ, मारहाण करीत आहेत. कुठला पोलीस मार खाऊन घरी गेला नाही असा दिवस शोधावा लागेल. हे फारच गंभीर आहे. याला काही आक्रस्ताळ पोलीसही जबाबदार आहेत. लोकांशी संयमाने, शांतपणे न बोलता बरेच पोलीस लोकांशी उर्मटपणे बोलतात. अशा पोलिसांना समुपदेशनाची गरज आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करून, त्यांना जेलमध्ये टाकून पोलिसांवरील हल्ले कमी होणार नाहीत. उलट गुन्ह्यांमध्ये वाढ होणार आहे एवढे लक्षात ठेवा. पोलिसांनी आपली कार्यपद्धती बदलावी. लोकांशी सौजन्याने बोलावे. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. परंतु असे होत नाही बरेच पोलीस गुन्हेगारी प्रवृत्तींनाच पाठीशी घालतात त्यामुळेच त्यांच्यावरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समाजात दुष्ट प्रवृत्ती वाढल्यावर आणखी काय होणार?
प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा’ जर अमलात आला तर त्याचा राज्यकर्ते ‘बीड प्रमाणे मोठ्या प्रमाणात गैरवापर करणार. पोलिसांना गुलामासारखे वागवणार आणि आपल्या शत्रुपक्षाला नामोहरम करणार. हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे. पोलिसांची अर्धी अधिक मानहानी राज्यकर्तेच करीत आहेत. आज ‘सिंघम’ बनण्याचे धाडस कुणीही दाखवत नाही. त्यामुळे लोक सरकारवरील राग पोलिसांवर काढीत आहेत. त्यांचे मॉब लिंचिंग होत आहे. गेल्या आठवड्यात बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी ठेचून ठेचून मारले. महाराष्ट्रात अशी वेळ येऊ नये इतकेच ।
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List