मुद्दा – प्राध्यापक बनले वेठबिगारी!
>> प्रा. सचिन बादल जाधव
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सीएचबी प्राध्यापकांची अवस्था अत्यंत दयनीय असून तुटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च भागत नसल्याने टपरी, वडापावची गाडी, भाजीपाला, रंगकाम, गवंडीकाम करून उदरनिर्वाह करावा लागत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्राध्यापकांची भरती न केल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयांमध्ये असंख्य जागा रिक्त आहेत. आशा रिक्त जागांच्या ठिकाणी स्वतः महाविद्यालये सीएचबी तत्त्वानुसार प्राध्यापकांची भरती करीत असून त्यांना दर महिन्याला फक्त दहा ते पंधरा हजार एवढे तुटपुंजे वेतन देत आहेत. काही ठिकाणी तर सीएचबी तत्त्वावर काम करणारे असे प्राध्यापक आहेत की, त्यांनी पात्रतेच्या निकषापेक्षाही उच्च पदव्या हस्तांतरित केलेल्या आहेत. जसे, उच्च पदवी, सेट, नेट, पीएचडी, एलएलबी व इतर काही पदव्या. पण सरकार भरतीला देत असलेल्या चालढकलीमुळे हा सर्व तासिका तत्त्वावर काम करणारा प्राध्यापक वर्ग त्रस्त झाला असून अशी वेठबिगारीची कामे करण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतरच उरले नाही.
राज्यातील काही महाविद्यालयांमध्ये तर असे उच्च शिक्षित प्राध्यापक आहेत की, भविष्यात आपण कायम होणार या आशेवर राहून त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सीएचबी तत्त्वावर काम करून घालविले. तरी पण प्राध्यापक भरतीचा पत्ता नाही. नोकरीमध्ये कायम नसल्याकारणाने कोणी मुलगी देण्यास तयार नाही. वय होत चालले आहे. अशा अनेक यातना कामात कायम नसणाऱ्या वरिष्ठ प्राध्यापकांच्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक पालकांनी मुलगा वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे. कायम नसला म्हणून काय झाले. आज ना उद्या तो होईल. या आशेवर राहून त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुली अशा मुलांना दिल्या आहेत. कुटुंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नसल्याने अनेक शहरी भागातील सी. एच. बी. तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रांत काम करत आहेत. सकाळी 6 वाजता लवकर घरातून बाहेर पडायचे ते रात्री 11 वाजता घरी यायचे असा यांचा दिनक्रम असल्या कारणाने घरातील व्यक्तींना वेळ देऊ शकत नाहीत. यांच्या असंख्य असणाऱ्या यातना आम्ही पाहू शकत नाही. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने लवकरात लवकर वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीला सुरुवात करून सी.एच.बी. तत्त्वावर काम करणाऱ्या लोकांना कायम करून त्यांच्या जीवनात एक नवचेतना निर्माण करावी. जेणेकरून ते त्यांचे पुढील आयुष्य वेठबिगारी म्हणून नाही, तर प्राध्यापक म्हणून जगू शकतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List