मग गृह खाते झोपले होते काय? उद्धव ठाकरे यांचा हल्ला
नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती असा दावा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, मग दंगल होत असताना त्यांच्याच अखत्यारित असलेलं गृह खातं झोपलं होतं का? असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.
विधान भवन आवारात उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागपूर दंगलीवरून गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गृहमंत्र्यांचं घर हे नागपुरात आहे, आरएसएसचं मुख्यालय नागपुरात आहे. तिथे डबल झेड सिक्युरिटी आहे. मग नागपुरात हिंदू खतरे में कसा? इतकी वर्षे काय केलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
‘नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित असेल आणि पूर्वनियोजित कट देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर आला होता, त्यांना आधीच माहीत होतं तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं? या एका प्रश्नात अनेक प्रश्न दडले आहेत. सरकार आपलं अपयश लपवण्यात आणखी अपयशी ठरत आहे,’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
औरंगजेब पेंद्र सरकार आणि भाजपचा लागतो तरी कोण?
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्दय़ावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढय़ सत्तेला नमवून स्वराज्याची स्थापना केली होती. गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता, पण महाराजांकडून प्रेरणा घेतलेले छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी आणि असंख्य मावळय़ांनी त्याला महाराष्ट्रातच मूठमाती दिली. मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर उखडण्यात असमर्थता दाखवली आहे कारण केंद्र सरकारचे त्याच्या कबरीला संरक्षण आहे. औरंगजेब केंद्र सरकार आणि भाजपचा लागतो तरी कोण?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
…आधी भाजपच्या झेंडय़ातला हिरवा रंग काढा!
भाजपचं हिंदुत्व म्हणजे ढोंग आहे. भाजपला हिरव्या रंगावर राग असेल तर सर्वात आधी त्यांनी त्यांच्या झेंडय़ातील हिरवा रंग काढून दाखवावा, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. मंत्र्यांची पोरं, अमित शहांचा मुलगा जय शहा दुबईत जाऊन हिंदुस्थान-पाकिस्तान मॅच पाहतात आणि इकडे गोरगरीबांच्या मुलांना हिंदुस्थान-पाकिस्तान करून एकमेकांशी लढवतात, हे हिंदुत्व कोणतं? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
औरंगजेब आणि अफझलखानाचं थडगं हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. औरंगजेबाची कबर उखडायची असेल तर नक्की उखडा, पण त्यासाठी नौटंकी कशाला करता? थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून कबर उखडायला सांगा आणि त्या कार्यक्रमाला चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनाही नक्की बोलवा.
…तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये बसले होते
उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माफी मागितली होती, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केला होता. त्याबाबत माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारले असता, होय… त्यावेळी एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्यात म्हणजे डस्टबिनमध्ये बसले होते, आम्हाला माहीतच नाही, असे उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने पत्रकारांमध्ये हशा पिकला. विधान परिषदेत अनिल परब बोलायला उभे राहिले तेव्हा एकनाथ शिंदे आक्रमक दिसून आले असे पत्रकारांनी सांगितले असता, ‘तो आक्रमकपणा नाही तर भेदरटपणा होता’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List