छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला; अटक होण्याची शक्यता
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरl त्यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आता कोरटकर याचा अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय देताना कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची विनंती मान्य केली आहे. प्रशांत कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी 17 मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल 18 मार्चपर्यंत राखून ठेवला होता. आता हा निकाल समोर आला असून न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता कोरटकर याला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List