सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले
भाजपच्या मंत्र्यांच्या मुलांनी हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामने भरवायचे आणि ते दुबईत जाऊन पाहायचे देखील. आणि इथे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी रात्री तुफान हिंसाचार झाला. यावेळी दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर परिसरात मोठे तणावाचे वातावरण होते. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत तसेच हल्लात 33 पोलीस जखमी झाले आहेत. विधानभवनाबाहेर बोलताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून भाजप व सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.
” छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेबाला व बलाढ्य सत्तेला नमवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. महाराजांच्या निधनानंतर तो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण महाराष्ट्राच्या मातीचा कणही जिंकू शकलेला नाही. महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने, छत्रपती संभाजी महाराज, रामराजे महाराज, राणी ताराराणी व असंख्य मावळ्यांनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात काय औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण तो इथल्या मातीचा कणही जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचं समर्थन कुणी शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे जर कुणी त्याचं थडगं उकरण्याची भाषा करत असेल तर डबल इंजिन सरकार काय नुसतं वाफा सोडतंय का? मुख्यमंत्र्यांनी ही कबर उद्ध्वस्त करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्याला केंद्रांचं संरक्षण आहे. केंद्र सरकार जर औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देत असेल तर तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेब असो अफजलखान असो हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचे तर तुम्ही आंदोलन काय करताय? मोदींकडे जा व सांगा गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा व तो सोहळा कराल तेव्हा नितीश बाबू व चंद्राबाबूंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा.
गृहमंत्र्यांचं घर नागपूर आहे, संघाचे मुख्यालय नागपूरात आहे. अशा नागपूरात हिंदू खतरे में कसं, इतके वर्ष तुम्ही काय केलं. आणि जर हे पूर्वनियोजित होतं तर तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का? हे तुमच्या कानावर का नाही आलं आणि आलं तर कारवाई का नाही केली? सरकार त्याचं अपयश लपवण्याचं प्रयत्न करतेय व अपयश लपवण्यात आणखी अपयशी ठरतेय. भाजपचं हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलं आहे. तुम्हाला जर हिरव्या रंगावर राग असेल तर तुम्ही पहिला तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. नंतर हिंदू मुस्लिम करा. एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं व दुसरीकडे पाकिस्तानसोबत मॅच खेळायची. ती मॅच दुबईला घ्यायची आणि मग यांची पोरंटारं ती मॅच जाऊन बघणार. अमित शहांचा मुलगा मॅच आयोजित करणार आणि इथं हिंदुस्थान पाकिस्तान करून सामान्यांच्या मुलांना लढवायचं. हे हिंदुत्व कोणतं. बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार होतायत हे समोर आल्यानंतरही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेटमॅच खेळायची. सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले.
भाजप खासदार प्रदीप पुरोहीत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील उद्धव ठाकरे यांनी खऱपूस समाचार घेतला. ”हेच भाजपचं घाणेरडं राजकारण आहे. कुणाही ऐरागैऱ्याची आमच्या दैवतासोबत तुलना करायची. कोरटकर मोकाट सुटलाय, सोलापूरकर मोकाट आहेत, कोश्यारी इथे मजा मारून गेलेले आहेत. म्हणजे एका बाजूला शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढून आमच्यात दंगली लावायच्या. कर्तृत्वहिन माणसांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणाऱ्या एकाला तरी भरचौकात फटकवलं तर पुढे हे प्रकार होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे अपयशी सरकार आहे. फसविगिरी करून सत्तेवर आले आहेत. परवा कैलास नागरेंच्या बहिणीने सर्वांसमोर सरकारला फटकारलं. त्या म्हणाल्या की भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकऱी आत्महत्या करतायत. लाज नाही वाटत तुम्हाला. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. औरंगजेबाचं थडगं जरूर उकरा पण शेतकऱ्यांच्या चिता जळतायत त्याकडे लक्ष देणार की नाही. नागपूरचा हल्ला पूर्व नियोजित होता असं हे म्हणतात. नागपूरमध्ये संघाचे मुख्य कार्यालय आहे. तिथे डबल झेड संरक्षण आहे. पूर्वनियोजित हल्ला करण्यासाठी लोकं बाहेरून आले असतील असं उपमुख्यमंत्री म्हणाले. यावरून यांचं सरकार किती बेकार आहे हेच त्यांनी सांगितलंय. हे सरकारचं अपय़श आहे त्यामुळे यांनी राजीनामा द्यायला हवा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List