निखळलेले प्लास्टर, गंजलेल्या सळ्या, कमकुवत कठडे ; बामणघर-गौळवाडी पुलाची ‘सावित्री’ होण्याचा धोका
बामणघर-गौळवाडी पुलाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. निखळलेले प्लास्टर… गंजलेल्या सळ्या, कमकुवत कठडे यामुळे लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून ‘सावित्री’ होण्याचा धोका आहे. सावित्रीसारखी पुनरावत्ती होऊन अनेकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल तळावासीयांनी विचारला आहे.
बामणघरपासून गौळवाडीला जाण्यासाठी तीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. बामणघरहून गौळवाडीला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून दररोज लाखो गावकरी या पुलाचा वापर करतात. काही महिन्यांपूर्वी हा पूल एका बाजूला खचला. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
अखेर ग्रामस्थांनी श्रमदान करून पुलाची डागडुजी केली. पुलावरून बारमाही वाहतूक सुरू असते. प्लास्टर निखळून सळ्या बाहेर आल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. या पुलाची पुरती दैना झाली असून पावसाळ्यात तर पुलावरून पाणी जाते. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळावा याकरिता पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List