रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 357 गावातील 722 वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन हजार मिमी पाऊस पडूनही एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावते. यंदा संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा 357 गावांतील 722 वाड्यांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात 9 कोटी 49 लाख 70 हजार रुपयांची तरतूद विविध कामांसाठी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकही टँकरची आवश्यकता भासलेली नाही. पहिल्या टप्यात 202 गावांतील 381 वाड्यांकरिता 7 कोटी 78 लाख 90 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये नवीन विंधण विहिरींसाठी 96 गावांतील 184 वाड्यांसाठी 2 कोटी 20 लाख 80 हजार, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी 39 गावांतील 59 वाड्यांतील 59 योजनांसाठी 4 कोटी 13 लाख 50 लक्ष, तात्पुरती पूरक नळपाणी पुरवठा योजनांसाठी 11 गावांतील 19 वाड्यांमधील 19 योजनांकरिता 98 लाख 10 हजार, टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 27 गावांतील 61 वाड्यांसाठी 12 लाख 30 हजार रुपये आवश्यक आहेत.
टंचाईवरील उपाययोजनांच्या कामांना 31 मार्चपर्यंत मंजुरी घेणे आवश्यक आहे. ती मंजुरी मिळाली नाही तर उर्वरित निधी शासनाकडून मिळत नाही. यंदा टंचाई आराखडा बनवण्यात विलंब झालेला आहे. त्यामुळे या निधीतील उपाययोजनांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून 2025 या कालावधीकरिता 155 गावांतील 341 वाड्यांसाठी 1 कोटी 70 लाख 80 हजार रुपयांचा आराखडा केला आहे. त्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 104 गावांतील 243 वाड्यांकरिता 22 टॅंकरना 80 लाख 10 हजार रुपये व विहीर खोल करणे, गाळ काढणे या कामांतर्गत 51 गावातील 98 वाड्यांकरिता 90 लाख 70 हजार रुपयांचा आराखड्यात समावेश आहे. जिल्ह्याच्या एकूण आराखड्यात 9 कोटी 49 लाख 70 हजार रुपयांची तरतूद केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List