प्रशांत दामलेंचा मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय
मुंबईतील माटुंगा इथल्या यशवंत नाट्यसंकुल इथं सोमवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कामाच्या तणावामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांचा हा राजीनामा बैठकीत नामंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांनी पुन्हा अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्य परिषदेतील विविध वादांमुळे प्रशांत दामलेंनी हे राजीनामा नाट्य केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र माझ्या राजीनाम्यासाठी कोणताही वाद कारणीभूत नाही, असं स्षष्ट करत दामलेंनी कामाच्या तणावाचं कारण सांगितलं.
सोमवारी 17 मार्च रोजी नियामक मंडळाची बैठक घेण्यात आली होती. यावेळी व्यग्र वेळापत्रकामुळे नाट्य परिषदेच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार नसल्याचं म्हणत प्रशांत दामलेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. परंतु नियामक मंडळातील सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याला विरोध केला. राज्यभरातील नाटकांच्या दौऱ्यामुळे नाट्य परिषदेच्या कामासाठी पुरेसा वेळ देणं शक्य नसल्याचं कारण प्रशांत दामलेंनी दिलं होतं. त्याचप्रमाणे वयाच्या 64 व्या वर्षी नाट्य परिषदेच्या कार्यालयात रोज येणं शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रशांत दामलेंनी दिलेल्या कारणाचा विचार करत नाट्य परिषदेच्या कामाची जबाबदारी वाटून देणं अपेक्षित असल्याचं निरीक्षण नियामक मंडळाच्या सदस्यांनी यावेळी नोंदवलं. त्याचप्रमाणे फक्त दामलेंनी कामाचा सर्व भार घेऊ नये, असाही सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर प्रशांत दामलेंनी राजीनामा मागे घेतल्याचं म्हटलं जात आहे.
प्रशांत दामले हे गेल्या 40 वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1983 पासून ते रंगभूमीशी जोडले गेले आहेत. ‘टूरटूर’ या मराठी नाटकातून ते विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘मोरूची मावशी’ या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. आजवरच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 37 चित्रपट आणि 26 नाटकांमध्ये अभिनय केला. त्यांचे ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही नाटकं आणि ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’ हे चित्रपट विशेष गाजले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List