मुंबईकरांनो धुलिवंदन खेळा पण जरा जपून… ‘या’ गोष्टी केल्यास थेट खावी लागेल तुरुंगाची हवा
सध्या संपूर्ण राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात धुलिवंदनाच्या निमित्ताने मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईत साधारण ११ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासोबतच जर सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगाचे पाणी उडवणे, अश्लील टीका, टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त
मुंबईसह महाराष्ट्रात सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पोलिस दलाकडून वाहतूक विभागासह ७ अपर पोलिस आयुक्त, १९ पोलिस उपायुक्त, ५१ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह १,७६७ पोलिस अधिकारी व ९,१४५ पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी, बीडीडीएस टीम, होमगार्ड्स यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
अश्लील शब्द किंवा सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे किंवा अश्लील गाणी गाणे यावर निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच हावभाव किंवा नक्कल, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करण्यासही मनाई असणार आहे. त्यासोबतच रंगाचा बेरंग केला तर कोठडीचीही हवा खावी लागू शकते, अशीही सूचना करण्यात आली आहे.
नागपुरात ४ हजार पोलीस तैनात
महाराष्ट्रात धुळवळीच्या निमित्ताने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना नागपूर शहरात 4000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या काळात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच रंग खेळताना कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांना करण्यात आले आहे.
नागपूर शहरात आज सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. समाजकंटकांकडून गैरप्रकार करून उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ नये याकरिता पोलीस सतर्क झाले आहेत. धुळवळीच्या निमित्ताने शहर बस सेवा बंद असणार आहेत. सकाळच्या वेळी नागपूर मेट्रो देखील बंद असणार आहे. स्टंटबाजी करणाऱ्या युवकांची बाईक देखील जप्त करण्यात येणार आहे. तसेच रंगाचे फुगे मारल्यास पोलीस कारवाई करणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List