माझा भाऊ हा महादेवाचा निस्सीमभक्त आहे, त्याला ‘महाकाल’…काय म्हणाले कैलास बोराडे यांचे मोठे बंधू
राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट असतानाच परवा रात्री अचानक जालनाच्या आन्वा येथील कैलास बोराडे या तरूणाला सळ्यांनी चटके दिल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या रात्री मंदिरातच ही घटना घडल्याचे म्हटले जात होते. यानंतर कैलास बोराडे याचा आणखी एक व्हिडीओ मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता. त्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता या प्रकरणात कैलास बोराडे यांचे सख्खे बंधू भगवान गोविंदा बोराडे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
आमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे
महाशिवरात्रीच्या रात्री मंदिरातच ही घटना घडली असून जुन्या वादातून कैलास बोराडे याला तापत्या लोखंडी रॉडने अमानुष चटके देण्यात आले होते.त्यानंतर लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी या प्रकरणी टीका केली होती. पण आता याप्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एक नवीन व्हिडिओ जाहीर केला आहे. त्यात कैलास बोराडे अर्धनग्न अवस्थेत मद्याच्या नशेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर आता कैलास बोराडे याचे मोठे बंधू भगवान बोराडे यांनी हा समाजाचा विषय नाहीए. आमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे, आम्हाला तुमचा पाठिंबा असूद्या अशी विनंती बोराडे यांचे बंधू भगवान बोराडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांना केली आहे.
हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे
माझ्या भावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा भाऊ हा महादेवाचा निस्सीमभक्त आहे.आणि आमच्या परिसरामध्ये त्याला ‘महाकाल’ या टोपण नावानेच बोलवलं जातं. त्यामुळे त्याची बदनामी होण्यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचं कैलास बोराडे यांचे मोठे बंधू भगवान बोराडे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाला भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नको ती सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू माझी राज्य सरकारला विनंती आहे की, हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे.
आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे वंशज
ज्यावेळी आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून हा विषय सांगितला. तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिले आहे की गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असल्याने आम्ही महादेवाची नेहमी भक्ती करीत असतो, त्यामुळे मुख्य मुद्द्यापासून या प्रकरणाला भरकटवण्यासाठी पूर्ण ताकद लावली जात आहे. परंतू मला अपेक्षा आहे की माझ्या भावाला आणि कुटुंबाला न्याय मिळावा असे भगवान बोराडे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांना सांगू इच्छीतो की तुमचा काही तरी गैरसमज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला तुमचं सहकार्य हवे आहे.कारण हा समाजाचा विषय नाहीए,आमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे असेही भगवान बोराडे यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List