विक्की कौशलने हंबरडा फोडला… संपूर्ण सेट सुन्न होता; आशिष पाथोडेने सांगितला सेटवरील भावूक किस्सा
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचे नाव सध्या सर्वांच्या तोंडून निघत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने येसुबाई ही भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता आशिष पाथोडेने अंताजी हे पात्र साकारले आहे. आशिषने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सेटवरी भावनिक किस्सा सांगितला आहे.
अभिनेता आशिषने नुकताच एका मुलाखतीमध्ये अंताजी यांच्या अखेरच्या क्षणांच्या शुटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. ‘माझा छावासिनेमामध्ये मृत्यू दरम्यानचा जो सिक्वेन्स आहे, ज्यामध्ये राजे ओरडतात. लक्ष्मण उतेकर सरांचे म्हणणे होते की सिनेमातील प्रत्येक मावळ्याचा किंवा योद्धाचा मृत्यू हा वीरेचीत (पराक्रमी) वाटला पाहिजे. ज्या प्रकारे विकी कौशल या सीनमध्ये ओरडतो, माझ्या नावाने ज्या प्रकारे आर्ततेने हंबरडा फोडतो ते पाहून सेटवरील सर्वांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. त्या दिवशी सगळा सेट सुन्न झाला होता,’ असे आशिष म्हणाला.
पुढे आशिष म्हणाला की, ‘पूर्वजन्मी आपण काहीतरी चांगलं केलंय म्हणून मला या गोष्टी करायला मिळत आहेत, अंताजी यांच्या मार्फत हे जगायला मिळत आहे. यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. माझी गणपती बाप्पावर खूप श्रद्धा आहे. मला असे वाटते की बाप्पांनी अंताजीच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला आशीर्वाद दिला आहे.’
‘छावा’ हा सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने २१ दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २१व्या दिवशी देखील चित्रपटाने ५.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४८३.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट ५०० कोटी रुपयांचा पल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List