रुग्णांना लागणार पुस्तक वाचनाची गोडी, डॉ. रत्नपारखी दाम्पत्याने रुग्णालयात सुरू केले ग्रंथालय आणि वृत्तपत्र वाचनालय
मृत्युंजय, श्रीमान योगी, पानिपत, दुनियादारी, अर्धांगी, ययाती, एक होता कार्व्हर, बनगरवाडी, राधेय, बटाटय़ाची चाळ यांपासून ते आरोग्याची गुरुकिल्ली आणि हसत खेळत जीवन कसे जगावे यावर मार्गदर्शन करणाऱ्या शेकडो पुस्तकांचा खजिना एका डॉक्टर दाम्पत्याने रुग्णांच्या भेटीला आणला आहे. मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडून पुस्तके वाचा, असा आग्रह धरत अंधेरीतील डॉ. गजानन रत्नपारखी आणि डॉ. स्मृती रत्नपारखी या दाम्पत्याने त्यांच्या रुग्णालयात भरगच्च पुस्तकांचे ग्रंथालय आणि वृत्तपत्र वाचनालय सुरू केले आहे. उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसण्यापेक्षा पुस्तकांचा खजिना चाळत वाचनाने समृद्ध व्हावे यासाठी त्यांनी हा वसा घेतला आहे.
डॉ. गजानन रत्नपारखी हे प्रख्यात हृदयरोगतज्ञ आहेत. त्यांनी आजवर 25 हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून रुग्णांना जीवदान दिले आहे, तर त्यांच्या पत्नी डॉ. स्मृती रत्नपारखी या दंतचिकित्सक आहेत. रुग्णसेवा करताना जनसेवा करता यावी यासाठी डॉ. रत्नपारखी यांनी गुरुकृपा हार्ट केअर सेंटरच्या माध्यमातून गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पालघर जिह्यातील अत्यंत दुर्गम भागातील 12 शाळा दत्तक घेऊन अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मराठी साहित्याचा खजिना वाचनासाठी उपलब्ध व्हावा याकरिता डॉ. रत्नपारखी यांनी त्यांच्या रुग्णालयात ग्रंथालय सुरू केले आहे. शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, पु. ल. देशपांडे, विश्वास पाटील, सुहास शिरवळकर, व. पु. काळे, शांता शेळके, ना. सं. इनामदार, बा. भ. बोरकर, अण्णाभाऊ साठे अशा मराठीतील नामवंत लेखकांबरोबरच इंग्रजी आणि हिंदी पुस्तकेही त्यांनी या ग्रंथालयात मांडली आहेत. याचबरोबर त्यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचनालयही सुरू केले आहे.
दरवर्षी दोन हजार रुग्णांची विनामूल्य तपासणी
डॉ. रत्नपारखी यांनी गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून अंधेरी येथे मधुमेह रुग्णांसाठी विनामूल्य उपचार पेंद्र सुरू केले आहे. दरवर्षी किमान दोन हजार रुग्णांच्या विनामूल्य तपासण्या करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. यासाठी डॉ. स्मृती रत्नपारखी यांचे डेंटल क्लिनिक आणि गुरुकृपा पॉलिक्लिनिकचे दालनही त्यांनी सुरू केले असून ज्येष्ठ पत्रकार नीलेश दवे, उद्योजक प्रकाश चिखलीकर, पत्रकार अनिल खेडेकर, चंद्रशेखर दाभोळकर, डॉ. राम चव्हाण आणि डॉ. शशांक शहा यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांचे उद्घाटन झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List