संमेलनाच्या जाहिरातींमध्ये संमेलनाध्यक्षा डॉ. तारा यांचा नामोल्लेखही नाही हे चीड आणणारे, काँग्रेसची टीका
मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर देशाच्या राजधानीत करण्यासाठी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज दिल्ली येथे सुरू झाले आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. संमेलन दिल्लीत असले तरी राज्य सरकारकडून मराठी साहित्य संमेलनाच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. मात्र, या जाहिरातींमधून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे छायाचित्र वा साधे नामोल्लेख ही नाही. ही चीड आणणारी बाब असून, भाजप अधीन महायुती सरकारचा महीलांबाबत असलेला दृष्टिकोन यातून स्पष्ट होत असल्याची टीका कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली असून याचा निषेधही केला आहे.
साहित्यिकांचा मेळा समजल्या जाणाऱ्या या संमेलनाच्या जाहिरातींमधून संमेलनाध्यक्षांना व स्वागताध्यक्षांना वगळणे हा मराठी साहित्य संस्कृतीचा अवमान असल्याचे त्यांनी सांगितले. पंडीत नेहरू पंतप्रधान असतांना दिल्ली येथे अ भा मराठी साहित्य संमेलन झाले होते व तत्कालीन स्वागताध्यक्ष हे पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री काका साहेब गाडगीळ होते. त्यानंतर यंदा दुसऱ्यांदा दिल्ली येथे सरहद, पुणेच्या पुढाकारातून साहित्य संमेलन होत असताना, सरहद्द संस्थेचे संजय नहार, साहित्य संमेलनाच्या सहाव्या महिला अध्यक्षा तारा भवाळकर, स्वागताघ्यक्ष शरद पवार व मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळणे बाबत केंद्र सरकारकडे 2014 सालीच प्रस्ताव पाठवणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इ. चा नामोल्लेख करणे महाराष्ट्राच्या संस्कार व संस्कृतीला अधिक शोभले असते, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या जाहिरातींवर फडणवीस सरकारने वारेमाप खर्च केला आहे. मात्र, या जाहिरातींवर केवळ उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचेच छायाचित्र झळकावून, केवळ स्वतःचीच टिमकी मिरवण्याचा उद्योग निंदनीय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List