कंगना राणौत अडचणीत, कॉपीराइट प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयाकडून नोटीस
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाने कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. महान कवी रामधारी सिंह दिनकर यांची सून कल्पना सिंह यांनी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने ‘इमर्जन्सी’ सिनेमाची निर्माती आणि अभिनेत्री कंगना राणौतला नोटीस पाठवून त्याचे उत्तर मागितले आहे. राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची सून कल्पना सिंह यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्पना सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘इमर्जन्सी’ सिनेमामध्ये राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या 26 जानेवारी 1950 रोजी लिहिलेल्या ‘जनतंत्र का जन्म’ या कवितेतील कवितेच्या ओळी परवानगी शिवाय वापरल्या गेल्या आहेत. ‘सिंहासन खाली करो कि जनता आती है’ ही ओळ आहे. या ओळीचा उपयोग सिनेमाचे प्रमोशन आणि गाण्यात केला आहे. त्यामुळे त्याच्या कॉपीराइटचे उल्लंघन झाले आहे. गुरुवारी या प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती ए अभिषेक शेट्टी यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. कंगना राणौत ‘इमर्जन्सी’ सिनेमाची निर्माती आणि दिग्दर्शक दोन्ही आहे. यासिनेमात तिने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही भूमिका साकारली आहे. तर सिनेमाचे गीतकार मनोज मुंतशीर आहेत. कल्पना सिंगने कंगना, मनोज मुंतशीर आणि सिनेमाच्या अन्य इतर निर्मात्यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी न्यायालयाकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
कल्पना सिंग यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षी 31 ऑगस्ट रोजी या सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. मात्र त्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान हा सिनेमा प्रदर्शित झाला. ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता न्यायालयाने कंगना राणौतसह सिनेमाशी संबंधित लोकांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणीत न्यायालय याप्रकरणी पुढील कारवाई करणार आहे. मात्र, सध्या सिनेमाच्या प्रदर्शनावर कोणतीही बंदी घातलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List