बेशिस्त वाहनचालकांनी वाहतूक शाखेला घातला 245 कोटींचा गंडा
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे फोटो काढले, चलान कापले तरी 32 लाख जणांनी दंड भरला नसल्याचे समोर आले आहे. या बेशिस्त वाहनचालकांनी ठाणे वाहतूक शाखेला तब्बल 245 कोटी 83 लाखांचा गंडा घातला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या सहा वर्षांत ई-चलानच्या माध्यमातून एकूण 51 लाख 44 हजार 752 केसेस करण्यात आल्या आहेत. यापैकी केवळ 92 कोटींचाच दंड वाहनचालकांनी भरला आहे. दुसरीकडे दंडवसुलीसाठी वाहनचालकांवर दबाव टाकू नये असे निर्देश असल्याने दंडाची थकीत रक्कम वसूल करायची कशी? असा प्रश्न ठाणे वाहतूक पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
ठाण्यात वाहने चालवताना नियमांचे पालन न केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी 2019 पासून ते 2024 अशा सहा वर्षांत मोठी कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये हेल्मेट न घालणे, ओव्हर सीट, कागदपत्रे नसणे, विरुद्ध दिशेने प्रवास करणे आणि ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अशा अनेक गोष्टींचा समावेश असून गेल्या सहा वर्षांत लाखो जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये जवळपास एकूण 338 कोटी 69 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. वसुलीसाठी वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता येत नाही तसेच वाहन जप्तीही करण्यात येत नाही तर केवळ ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा दंड वाहनचालकांकडून भरण्यात येतो. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी ई-चलानच्या माध्यमातून ठोठावलेला दंड भरण्यास वाहनचालकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दंडाची माहिती ई-चलान पोर्टलवर
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 विभाग कार्यरत आहे. आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई-चलानच्या पोर्टलवर उपलब्ध असते. तिकडेच दंडाची रक्कम दिलेली असते. ती भरण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांकडून मात्र त्याचा वापर केला जात नाही.
स्वतः दंड भरण्याची संख्या कमी
विशेष म्हणजे ई-चलानसाठी आवश्यक असलेल्या मशीन मागविण्यात आल्या. राज्यभरात कुठेही नियम मोडल्यास या मशीनमध्ये तत्काळ समजते. तसेच ठिकठिकाणी लावण्यात आलेले कॅमेरे आणि मशीन याद्वारे लाखो ई-चलान जारी करण्यात आले असले तरी दंडाची थकीत रक्कम वाढतच आहे. स्वतःहून दंड भरण्यासाठी येणाऱ्या चालकांची संख्या कमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List