पालकमंत्री पदावरून मिंधे-दादा गटातील वाद चव्हाट्यावर; तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भरत गोगावलेंचा जाहीर आरोप
पालकमंत्री पदावरून मिंधे गट आणि अजित पवार गटात ठिणगी पडली आहे. रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंना लक्ष्य केले आहे. तटकरेंच्या खासदारकीसाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले, पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप गोगावले यांनी केला आहे.
“पालीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून तटकरेंनी आम्हाला तिघांना पाडायचे प्रयत्न त्यांनी केले नाहीत हे सांगावे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बल्लाळेश्वराच्या मंदिरात यावे.”
भरत गोगावले
“आम्ही सुसंस्कृत आहोत. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत असे संघर्षाचे प्रसंग आले. मात्र माझ्यासोबत संघर्ष करणारे आता कुठे आहेत, हे बघा.”
सुनील तटकरे
महायुती सरकारने गोगावले यांना पालकमंत्री पदातून डावलून अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री बनवल्यापासून गोगावलेंसह त्यांचे समर्थक नाराजी व्यक्त करत आहेत. या वादामुळे मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतरही ही नाराजी थांबलेली नाही. गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केल्याचेही समजते.
तटकरेंना खासदारकीच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत घेतली, पण तटकरेंनी विधानसभेत आपले तीन आमदार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचे गोगावले यांनी शिंदेंना सांगितले. प्रसारमाध्यमांसमोरही त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. निवडणुकीत तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर पालकमंत्री पद त्यांच्यासाठी सोडले असते, पण आता ते शक्य नाही असा इशाराही गोगावलेंनी दिल्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाहीत ते आमचे काय होणार, अशीही टीका गोगावलेंनी तटकरेंवर केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List