उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवार यांची सडकून टीका
दावोसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. पण या दौऱ्यात उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावरच भाष्य करताना दिसले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडायला? असा सवाल शरद पवार यांनी केला.
शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘उद्योगमंत्री उदय सामंत यांचे दावोस येथील विधान मी ऐकले. उद्योगमंत्री दावोस येथे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की लोक फोडायला? त्यांनी दावोस येथून जी काही विधाने केली ती मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती.’
दावोसमध्ये ज्या 29 कंपन्यांबरोबर करार केले गेले त्यातील 28 कंपन्या या हिंदुस्थानी आहेत. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राबरोबर करार केला आहे. इतकेच नव्हे तर 28 पैकी 20 कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातील 15 मुंबईतील आहेत, असेही आता समोर आले आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री असताना मी देखील दावोसला गेलो होतो आणि अनेक कंपन्यांशी करार केले होते. पण काल करार झालेल्या कंपन्या महाराष्ट्रात आधीपासूनच आहेत. याचाच अर्थ गुंतवणूक करण्याचे आधी ठरवले, मग त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित केले गेले आणि तिथून त्यांना महाराष्ट्रात आणले असा दिखावा केला, असे पवार म्हणाले. तसेच गुंतवणुकीचे वातावरण तयार करायची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही ते म्हणाले.
दावोसमधील करारांत फक्त एकच कंपनी परदेशातील, 29 पैकी 28 कंपन्या हिंदुस्थानी
हे कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही
अमित शहा हल्ली जे काही बोलतात याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाने सतत घेतली आहे. त्यांच्या बोलण्याचा एकंदर टोण हा अति टोकाचा आहे. हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. अमित शहा कोल्हापुरात शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहिती नाही, असा टोलाही पवारांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List